MI vs LSG : मुंबईचा सलग सहावा पराभव

MI vs LSG : मुंबईचा सलग सहावा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क :IPL 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपरजायंट्सने 20 षटकांत चार गडी गमावून 199 धावा केल्या. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 37 धावा केल्या. लखनौच्या विजयात आवेश खानने 3 बळी घेतले.

19व्या षटकात जेसन होल्डरच्या षटकात मुंबईने 17 धावा केल्या. मुंबईला शेवटच्या सहा चेंडूत 26 धावांची गरज होती. अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जयदेव उनाडकट धावबाद झाला. त्याला सहा चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 14 धावा करता आल्या. यानंतर मुरुगन अश्विनने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. अश्विन (6) तिसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. पाचव्या चेंडूवर चमीराने पोलार्डला स्टॉइनिसकडे झेलबाद केले. त्याला 14 चेंडूत 25 धावा करता आल्या.

या मोसमात मुंबईचा हा सलग सहावा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच या संघाने पहिले सलग सहा सामने गमावले आहेत. याआधी 2014 मध्ये संघाने पहिले सलग पाच सामने गमावले होते. या पराभवामुळे मुंबईला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याचा धोका आहे. संघाला आता येथून सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. यासोबतच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागणार आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. हा त्याचा 100 वा आयपीएल सामना आहे. आपल्या 100व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. राहुल 60 चेंडूत 103 धावा करून नाबाद राहिला. आपल्या शतकी खेळीत त्याने नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले.

प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात चांगली झाली. राहुलने क्विंटन डी कॉकसोबत पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. डी कॉकला फॅबियन ऍलनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मुंबईसाठी फॅबियनचा हा पहिलाच सामना आहे. डी कॉक 13 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. त्यात चार चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. यानंतर राहुलने मनीष पांडेसोबत दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली.

मुरुगन अश्विनने ही भागीदारी तोडली. त्याने मनीष पांडेला क्लीन बोल्ड केले. मनीषला 29 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 38 धावा करता आल्या. मार्कस स्टॉइनिसला फार काही करता आले नाही आणि त्याने नऊ चेंडूत 10 धावा केल्या. दीपक हुडा आठ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावा काढून बाद झाला. कर्णधार केएल राहुल 103 धावांवर नाबाद राहिला आणि कृणाल पांड्याने एक धाव केली. मुंबईकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याचवेळी मुरुगन अश्विन आणि फॅबियन ऍलन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

कर्णधार राहुलचे शतक

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने आपल्या 100व्या आयपीएल सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 100 व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. 19 षटकांनंतर लखनौची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा होती.

लखनौला तिसरा धक्का

लखनौ सुपरजायंट्सला 17व्या षटकात तिसरा धक्का बसला. जयदेव उनाडकटने मार्कस स्टॉइनिसला रोहितकरवी झेलबाद केले. स्टॉइनिसला नऊ चेंडूत 10 धावा करता आल्या. स्टॉइनिस आणि राहुल यांच्यात 31 धावांची भागीदारी झाली. 17 षटकांनंतर लखनौने तीन गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा होती.

लखनौला दुसरा धक्का

लखनौ सुपरजायंट्सला 14व्या षटकात दुसरा धक्का बसला. मनीष पांडेला मुरुगन अश्विनने क्लीन बोल्ड केले. मनीषला 29 चेंडूत 38 धावा करता आल्या. त्यात सहा चौकारांचा समावेश होता. तत्पूर्वी, राहुलने त्याच्या 100व्या आयपीएल सामन्यात 29 वे अर्धशतक झळकावले. 14 षटकांनंतर लखनौची धावसंख्या दोन बाद 132 अशी होती.

केएल राहुलचे 29 वे अर्धशतक

लखनौचा कर्णधार केएल राहुलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 29 वे अर्धशतक झळकावत आपला चमकदार फॉर्म कायम ठेवला. त्याने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हा त्याचा 100 वा आयपीएल सामना आहे. 12 षटकांनंतर लखनौची धावसंख्या एका विकेटवर 106 आहे. सध्या मनीष पांडे 24 चेंडूत 29 धावा आणि केएल राहुल 51 धावा करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली.

लखनौला पहिला धक्का..

लखनौ सुपरजायंट्सला सहाव्या षटकात 52 धावांवर पहिला धक्का बसला. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू फॅबियन ऍलन, सीझनमध्ये आपला सामना खेळत होता आणि मुंबईसाठी त्याचा पहिला सामनाही त्याने क्विंटन डी कॉकला बाद केले. डी कॉक 13 चेंडूत 24 धावा करू शकला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news