राशिद खान : चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडेल

राशिद खान : चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडेल
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : गुजरात टायटन्सचा उपकर्णधार आणि जादुई फिरकी गोलंदाज राशिद खान सध्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करत आहे. अफगाणिस्तानच्या वतीने वन-डे क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा राशिद खान सध्या आयपीएलमध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उत्सुक आहे.

फलंदाजीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना राशिदने सांगितले की, टी-20 लढतींमध्ये मला कधी कधी पाच ते सहा चेंडूंच फलंदाजी करण्यासाठी मिळतात. अशा स्थितीत मोठे फटके मारणे, हा एकच पर्याय आपल्यासमोर असतो. यामध्ये कधी कधी यश मिळते तर कधी नाही. अफगाणिस्तानकडून वन-डे सामने खेळताना मला फलंदाजी करण्याची संधी मिळते. तेथे मी मोकळेपणाने फलंदाजी करतो. यामुळे मी सध्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करत आहे. भविष्यात टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरून संघाला विजय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन.

राशिद यास स्वतःला क्‍विक स्पिनर म्हणवून घेण्यास आवडते. यासंदर्भात त्याने सांगितले की, मी वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे अचूक टप्पा पकडण्यास मदत मिळते. आपला जुना संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळण्यासंदर्भात तो म्हणाला की, हा खरोखरच अत्यंत भावनिक होता.

गुजरात टायटन्समधील वातावरणाबद्दल बोलताना राशिदने सांगितले की, आम्ही येथे क्रिकेटचा आनंद लुटत आहोत. एकमेकांना आम्ही सपोर्ट करतो. प्रत्येक गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी सांगितली जाते. त्याप्रमाणे त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षा केली जाते. एक संघ म्हणून प्रत्येक खेळाडूची सकारात्मक भावना अत्यंत महत्त्वाची असते.

राशिदचे होणार शतक

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिदने आयपीएलमध्ये आतापर्यंत 99 विकेट घेतल्या आहेत. तो आता लसिथ मलिंगानंतर आयपीएलच्या इतिहासात जलद 100 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. यासंदर्भात राशिदने सांगितले की, पाच-सहा वर्षांपूर्वी मी आयपीएल खेळेन असे वाटले नव्हते. या स्पर्धेत विदेशी खेळाडू म्हणून 100 विकेटस् मिळविणे हे माझ्या कारकिर्दीतील मोठे यश ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news