पुढारी ऑनलाईन डेस्क :
IPL 2022 च्या 17 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा आठ गडी राखून पराभव केला. या मोसमातील गतविजेत्या सीएसकेचा हा सलग चौथा पराभव आहे. तर हैदराबादने मोसमातील पहिला सामना जिंकला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावा करता आल्या. मोईन अलीने 48 धावा केल्या.
प्रत्युत्तरात हैदराबादने 17.4 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. SRH साठी अभिषेक शर्माने 50 चेंडूत सर्वाधिक 75 धावांची खेळी खेळली. राहुल त्रिपाठी 15 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचबरोबर चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे.
हैदराबादला 13व्या षटकात 89 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार केन विल्यमसन 40 चेंडूत 32 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एका षटकार लगावला. 13 षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या एका विकेटवर 97 होती. 14 व्या षटकात त्यांनी शंभर धावांचा पल्ला ओलांडला.
चेन्नईकडून मोईन अलीने 35 चेंडूत 48 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय एकाही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. कर्णधार रवींद्र जडेजा 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. चेन्नईच्या संघाला पहिला धक्का सलामीवीर रॉबिन उथप्पाच्या रुपात बसला. वॉशिंग्टन सुंदरने 15 धावांवर उथप्पाला मार्करामच्या हाती झेलबाद केले. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने पुन्हा निराशा केली आणि तो टी नटराजनच्या चेंडूवर 16 धावा काढून बस झाला. अंबाती रायुडूने सीएसकेचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याने 27 चेंडूत 27 धावा केल्या. पण सुंदरच्या चेंडूवर मार्करामकडे झेलबाद झाला. मोईन अलीने शानदार खेळी करत 35 चेंडूत 48 धावा केल्या. तो मार्करामच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
सीएसकेसाठी मागील सामन्यांमध्ये चांगली खेळी खेळणाऱ्या शिवम दुबेने या सामन्यात निराशा केली. तो 3 धावांवर टी नटराजनच्या चेंडूवर उमरान मलिककरवी झेलबाद झाला. तर एमएस धोनीने हैदराबादविरुद्ध तीन धावांची खेळी केली आणि जॅनसेनने त्याचा डाव संपवला. कर्णधार जडेजा 23 धावा करून भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर विल्यमसनकरवी झेलबाद झाला. शेवटी ब्राव्हो 8 आणि जॉर्डन 6 धावांवर नाबाद राहिले. हैदराबादचे सर्वात यशस्वी गोलंदाज सुंदर आणि नटराजन ठरले. दोघांना प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.
तत्पूर्वी, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. शशांक सिंग आणि मार्को यानसेन यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. ड्वेन प्रिटोरियसच्या जागी श्रीलंकेचा फिरकीपटू महेश टीक्षनाचा समावेश करण्यात आला आहे.
या हंगामात दोन्ही संघांचा फॉर्म खराब आहे. सीएसकेने तिन्ही सामने गमावले आहेत. त्याचवेळी हैदराबादनेही आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार रवींद्र जडेजाचा हा 150 वा सामना आहे. चेन्नईकडून 150 सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी एमएस धोनी (217) आणि सुरेश रैना (200) यांनी ही कामगिरी केली आहे.
रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (कर्णधार), शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश टेकशाना, मुकेश चौधरी.
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को यानसेन, उमरान मलिक, टी नटराजन.