Virender Sehwag : ‘वडा पाव’ ट्विट सेहवागला पडले महागात | पुढारी

Virender Sehwag : 'वडा पाव' ट्विट सेहवागला पडले महागात

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virender Sehwag : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI)ने तीन सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी ६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुंबईवर ५ गडी राखून विजय केला. या सामन्यात विजयाचा हिरो ठरलेल्या पॅट कमिन्सने १४ चेंडूत अर्धशतक झळकावत सामना एकतर्फी केला.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एक मजेशीर ट्विट केले आणि कमिन्सच्या फलंदाजीचे वेगळ्या पद्धतीने कौतुक केले. कमिन्सचे कौतुक करताना, सेहवागने वडा पावचा उल्लेख केला, ज्यामुळे रोहित शर्माचे चाहते संतप्त झाले आणि त्यांनी सेहवागला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

खरंतर, सेहवागने (Virender Sehwag) ट्विट करताना लिहिले की, “तोंडातून घास हिसकावून घेतला, सॉरी वडा पाव हिसकावून घेतला. पॅट कमिन्सची खेळी ही आतापर्यंतची विलक्षण आणि क्लीन हिटिंग ठरली. १५ चेंडूत ५६… जीरा बत्ती.’

हे ट्विट पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते भडकले. त्यांनी सेहवागला (Virender Sehwag) ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहत्यांना वाटले की, सेहवागने रोहितला वडा पाव संबोधले आहे. त्यामुळे चाहत्यांनी सेहवागला धारेवर धरले. अखेर सेहवागला आपल्या ट्विटबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रियेवर सेहवागने आणखी एक ट्विट केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये माजी भारतीय खेळाडू म्हणाला की, वडा पाव हे मी एकूण मुंबई संघाशी संबंधीत म्हटले आहे. वडापावसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आहे. रोहितच्या चाहत्यांनो. मी तुमच्यापेक्षा त्याच्या (रोहित) फलंदाजीचा मोठा चाहता आहे.’

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने यंदाच्या हंगामातील त्यांच्या तिसऱ्या विजयानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांचा संघ सध्याच्या हंगामातील सर्वात मजबूत संघ असल्याचे दिसत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला प्रत्येक सामन्यात वेगवेगळे सामनाविजेते मिळाले आहेत.

Back to top button