रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का; महागडा खेळाडू अनुपलब्धच | पुढारी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का; महागडा खेळाडू अनुपलब्धच

मुंबई ; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला मोठा धक्का बसला असून, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड अजून या संघाशी जोडलाच गेलेला नाही. एवढेच नव्हे, तर आणखी किमान एक आठवडा तो आरसीबीकडून खेळू शकणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेला होता. त्यात हेजलवूडदेखील होता. आयपीएल 2022 मध्ये येण्याआधी 3 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागतो. त्यामुळे हेजलवूड हा 12 एप्रिल रोजी होणार्‍या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. आयपीएलमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हेजलवूड पुढील काही दिवसांत संघासोबत जोडला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या अन्य खेळाडूंप्रमाणे तो पाकिस्तान दौर्‍यानंतर थेट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी येणार नाही. त्याने वैयक्तिक कारणामुळे काही दिवसांची विश्रांती घेतली आहे.

दुसर्‍या बाजूला क्रिकेट ऑस्ट्रेलिया जारी केलेल्या नियमानुसार बोर्डाच्या करारात सहभागी असलेल्या खेळाडूंना 6 एप्रिलच्या आधी निवडीसाठी उपलब्ध होता येणार नाही. म्हणजेच आरसीबीसाठी एका बाजूला ग्लेन मॅक्सवेल संघात दाखल झाल्याचा आनंद होणार असला तरी त्याचा लगेच फायदा होणार नाही.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये जोश हेजलवूडला सर्वाधिक बोली लागली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला 7.75 कोटींना खरेदी केले होते.

Back to top button