राजस्थान रॉयल्सकडून पहिल्या सत्रातील कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा

राजस्थान रॉयल्सकडून पहिल्या सत्रातील कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आयपीएलच्या पहिल्या सत्राचा विजेता असलेला राजस्थान रॉयल्स हा संघ नंतरच्या 13 सत्रात मात्र पुन्हा विजेतेपद मिळवू शकला नाही. हा संघ आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करतो; परंतु स्पर्धा संपत येता येता संघाची गाडी रुळावरून कधी उतरते ते त्यांनाही समजत नाही. पहिल्यांदा त्यांनी स्पर्धा जिंकली त्यावेळी आयपीएल म्हणजे काय हे काही संघांना नीट कळालेही नव्हते.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न हा या यशाचा जनक होता. नुकतेच त्याचे निधन झाले. यंदा जर राजस्थानने विजेतेपद मिळवले, तर ही त्याच्यासाठी मोठी श्रद्धांजली ठरेल. महालिलावाच्या आधी संघाने कर्णधार संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना रिटेन केले, पण संधी असतानाही त्यांच्या हातून जोफ्रा आर्चर आणि रवी बिश्‍नोईसारखे खेळाडू निसटले.

यापैकी एकाला ते रिटेन करू शकले असते. तरीही त्यांनी उपलब्ध पैशात चांगली संघ बांधणी केली आहे. त्यांनी प्रसिद्ध कृष्णाला 10 कोटींपर्यंत बोली लावत ताकदीने संघात घेतले. त्यापाठोपाठ त्यांनी शिमरॉन हेटमायरसाठी 8.5 कोटी खरेदी केले. जोफ्राची भरपाई करण्यासाठी त्यांनी ट्रेंट बोल्टला 8 कोटींची किंमत दिली, तर आरसीबीच्या देवदत्त पडिक्‍कलला आपल्या तंबूत आणण्यासाठी 7.75 कोटी मोजले. युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्‍विन यांच्याकडे फिरकीची जबाबदारी असणार आहे.

ताकद : मजबूत फलंदाजी

राजस्थान रॉयल्स संघाकडे जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्‍कल, यशस्वी जैस्वाल यांच्या रूपाने चार खंदे सलामीवीर आहेत. या तिघांच्या प्रतिभेविषयी कुणालाच शंका नाही. याच्याशिवाय रियान पराग, हेटमायर, जिमी निशाम यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. गोलंदाजीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, युवा प्रसिद्ध कृष्णा ही जोडी विरोधी संघाला भगदाड पाडण्यास समर्थ आहे. 150 कि.मी./प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा कृष्णा हा भारतीय संघाचे भविष्य आहे.

त्या तुलनेत नवदीप सैनीकडून चांगली कामगिरी करवून घेण्यासाठी संघ व्यवस्थापनाला प्रयत्न करावे लागतील. रविचंद्रन अश्‍विन आणि युजवेंद्र चहल हे भारतीय संघातील अनभुवी फिरकी गोलंदाज राजस्थानकडे आहेत. भारतीय खेळपट्टीवरील कशी गोलंदाजी करायची हे त्यांना चांगले अवगत आहे.

कमजोरी : फिनिशरची कमतरता

आयपीएलचे बहुतांश सामने हे शेवटच्या षटकांपर्यंत अटीतटीचे होतात. अशावेळी चांगला फिनिशर उपयोगी ठरतो. महेंद्रसिंग धोनी, केरॉन पोलॉर्ड, ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल यांच्या तोडीचा फिनिशर राजस्थानकडे नाही. त्यांची सगळी भिस्त न्यूझीलंडच्या जिमी निशामवर आहे, पण या तुलनेत तो थोडा कमी पडतो.

असा आहे संघ : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैयस्वाल, जोस बटलर, रविचंद्रन अश्‍विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्‍कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिप्पा, नवदीप सैनी, ओब्ड मैककॉय, अनुनय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुयाल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम ग्रहवाल, जिमी नीशाम, नाथन कूल्टर-नाईल, रासी वेन डर डुसां, डेरल मिशेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news