आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ बलाढ्य म्हणून ओळखले जात होते; परंतु गेल्या दोन वर्षांत दिल्ली संघाने स्पर्धेमध्ये आपला जो दबदबा निर्माण केला आहे, तो वाखाणण्यासारखा आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्सचे 'दिल्ली कॅपिटल्स' असे नामकरण झाल्यापासून संघाची कामगिरी दिवसेंदिवस सरस होताना दिसत असून हा संघ विजेतेपदाच्या जवळ पोहोचला आहे.
गेल्या तीन वर्षांत दिल्लीने प्रत्येक वेळी प्ले ऑफ फेरी गाठली आहे. 2020 साली उपविजेतेपदही मिळाले. यशाची ही चढती कमान पाहून चाहत्यांना यंदा संघाकडून विजेतेपदाच्या अपेक्षा आहे. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. खेळाडू रिटेन करताना आणि लिलावातून खरेदी करताना त्यांनी कंजुषी केली नाही.
संघाने ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) आणि एन्रिच नोर्त्जे (6.5 कोटी) या चौघांना रिटेन केले. महालिलावात संघाने शार्दुल ठाकूर याला 10.75 इतकी मोठी बोली लावली. त्याचबरोबर मिशेल मार्श (6.5 कोटी), डेव्हिड वॉर्नर (6.25 कोटी) यांनाही भरपूर पैसे ओतले. वेस्ट इंडिजचा रावमेन पॉवेल, बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान हेही या संघात आहेत. त्यांच्या जोडीला खलील अहमद, चेतन सकारिया हे असणार आहेत. दिल्लीने डावखुर्या वेगवान गोलंदाजाचा ताफा तयार केल्याचे यावरून दिसत आहे.
ताकद : मजबूत फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी खूपच मजबूत असते. पॉवर प्लेचा विचार करता संघाने सलामीसाठी हिटर फलंदाजांचा विचार केला आहे. शिखर धवन पंजाबकडे गेल्यामुळे पृथ्वी शॉच्या जोडीला डेव्हिड वॉर्नर असेल. याशिवाय तिसर्या क्रमांकावरील मिशेल मार्श याने टी-20 वर्ल्डकपमध्ये आपल्या बॅटिंगची जादू दाखवली आहे.
विंडीजचा रावमेन पॉवेल याच्या फलंदाजीची ताकद भारतीयांनी नुकत्याच झालेल्या मालिकेत बघितली आहे. याशिवाय कर्णधार ऋषभ पंत हा कोणताही सामना कोणत्याही क्षणी फिरवण्यास सक्षम आहेच, पण संघात सगळेच हार्ड हिटर आहेत, त्यामुळे एखाद्यावेळी डावाची पडझड झाली तर एक बाजू सावरून संयमाने धावा करणारा फलंदाज दिल्लीकडे दिसत नाही.
कमजोरी : फिरकी गोलंदाजीची
रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा यांनी दिल्लीच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळली होती; परंतु आता ते संघात नाहीत, त्यामुळे रिटेन केलेला अक्षर पटेल आणि रिस्ट स्पीनर कुलदीप यादव या जोडीवर संघ अवलंबून असणार आहे. कुलदीपला संधी मिळत नसल्याने तो कशी कामगिरी करतो ते पाहावे लागेल. अंडर-19चा स्टार विकी ओस्तवाल हा त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहे.