Ind vs SL T20 : भारताचा लंकेला दणका, 3-0 क्‍लीन स्वीप

Ind vs SL T20 : भारताचा लंकेला दणका, 3-0 क्‍लीन स्वीप
Published on
Updated on

धर्मशाला ; वृत्तसंस्था : मधल्या फळीतील दमदार आणि भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या सलग तिसर्‍या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर तिसर्‍या टी-20 सामन्यात 6 विकेट आणि 19 चेंडू शिल्‍लक ठेवून विजय मिळवत क्‍लीन स्वीप दिला. भारताचा टी-20 मधील हा सलग दुसरा व्हाईट वॉश आहे. यापूर्वी त्यांनी वेस्ट इंडिजला 3-0 ने हरवले होतेे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने पहिला सामना 62 धावांनी तर दुसरा सामना 7 गडी राखून जिंकला होता. श्रेयस अय्यरला सामनावीर आणि मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

प्रथम फलंदाजी करणार्‍या श्रीलंकेला वरच्या आणि मधल्या फळीने दगा दिल्यानंतर कप्‍तान दासून शनाकाने वादळी 74 धावा करत 20 षटकांत 5 बाद 146 धावांपर्यंत पोहोचवले. भारताने हे आव्हान 16.5 षटकांत पूर्ण केले. मालिकेत तुफान फार्मात असलेल्या श्रेयस अय्यरने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने 45 चेंडूंत 73 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 1 षटकार मारला. पहिल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे नाबाद 57, नाबाद 74 धावा केल्या होत्या. दुखापतीनंतर खूप दिवसांनी पुनरागमन करणार्‍या रवींद्र जडेजा यालाही या मालिकेत सूर गवसला.

इशान किशनला दुखापत झाल्यामुळे संजू सॅमसन रोहित शर्माच्या जोडीला सलामीला आला; परंतु कर्णधार रोहित (5) याही डावात अपयशी ठरला. पण संजू आणि श्रेयसने संघाचे अर्धशतक पूर्ण केले. संजू 18 धावांवर बाद झाल्यानंतर आलेला दीपक हुडा झटपट 21 धावा करून बाद झाला. त्याच्या जागी आलेला वेंकटेश अय्यरने (5) निराशा केली. दरम्यान, दुसर्‍या बाजूने धावांची वसुली करीत असलेल्या श्रेयसने 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने रवींद्र जडेजाला साथीला घेत 17 व्या षटकांत भारताचा विजय साकारला.

तत्पूर्वी, धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर श्रीलंकेचा कप्‍तान दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे वेगवान गोलंदाज आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांनी तिखट मारा करत श्रीलंकेला चांगली सुरुवात करू दिली नाही.

सिराजने सलामीवीर दानुष्का गुणातिलकाला शून्यावर, तर आवेश खानने पाथुमा निसांकाला एका धावेवर तंबूत पाठवले. त्यानंतर आवेशने चरिथ असलंका (4) आणि फिरकीपटू रवी बिश्‍नोईने जेनिथ लियानागेला (9) बाद करत श्रीलंकेची अवस्था 4 बाद 29 अशी केली. यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश चंडीमलने 25 धावांची खेळी करत लंकेसाठी धावा जमवल्या, पण संघाचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तोसुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेचा कप्‍तान दासून शनाकाने चमिका करुणारत्नेला सोबत घेत 17 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.

शनाका-करुणारत्नेने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले. मागील सामन्याप्रमाणे शनाकाने फटकेबाजी केली. 19 व्या षटकात शनाकाने आपले अर्धशतक साजरे केले. याच षटकात शनाकाने 19 धावा वसूल केल्या. 20 व्या षटकातही शनाकाने दमदार फलंदाजी केली. 20 षटकांत श्रीलंकेने 5 बाद 146 धावा केल्या. शनाकाने 38 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 74 धावा ठोकल्या. करुणारत्ने 12 धावांवर नाबाद राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news