विराट कोहली : आरसीबी सोडण्याचा विचार केला होता | पुढारी

विराट कोहली : आरसीबी सोडण्याचा विचार केला होता

बंगळूर ; वृत्तसंस्था : मी आरसीबी संघ सोडण्याचा विचार केला होता; परंतु सुरुवातीच्या काळात संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, त्याला मी महत्त्व दिले आणि मी माझा विचार बदलला, असा खुलासा विराट कोहली याने आरसीबी पोडकास्टवर दानिश सैत याच्याशी बोलताना केला. आरसीबीशिवाय मी स्वतःला अन्य संघात पाहू शकत नाही, त्यामुळेच मी म्हणालो की, अखेरपर्यंत मी आरसीबीकडूनच खेळणार. या शहराने मला भरभरून प्रेम दिले. हे माझे घरच आहे, असेही कोहलीने सांगितले.

विराट कोहली हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू असेल की, जो एकाच फ्रँचायजीकडून इतकी वर्षे खेळतोय. महेंद्रसिंग धोनीलाही दोन वर्षे पुणे फ्रँचायजीकडून खेळावे लागले होते. त्यावेळेस चेन्नई सुपर किंग्सवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली गेली होती, पण कोहलीलाही आपण दुसर्‍या फ्रँचायजीकडून खेळावे असे वाटले होते; परंतु त्याने तसे केले नाही. आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असूनही त्याच्या नावावर एकही आयपीएल जेतेपद नाही. आयपीएल 2021 पूर्वी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

विराट म्हणाला, खरे सांगायचे तर मी दुसर्‍या संघाकडून खेळण्याचा विचार केला होता आणि अन्य फ्रँचायजींनी मला ऑक्शनमध्ये दाखल होण्यासही सांगितले होते; पण मी त्यानंतर पुन्हा विचार केला. आयपीएल ट्रॉफी जिंकली, यापेक्षा माझ्यासाठी आरसीबीसोबतची प्रामाणिकता महत्त्वाची आहे.

विराटने 207 आयपीएल सामन्यांत 37.39च्या सरासरीने 6283 धावा केल्या आहेत. त्यात पाच शतके व 42 अर्धशतकांचा समावेश आहे. तो पुढे म्हणाला, आयपीएल ट्रॉफी जिंकलो नाही, म्हणजे तो माझ्यासाठी जगाचा शेवट ठरत नाही. आरसीबीने पहिली तीन वर्षे मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला. हे माझ्यासाठी खूप खास होते.

Back to top button