अजिंक्य फॉर्मात; रणजी स्पर्धेत झळकावले शतक | पुढारी

अजिंक्य फॉर्मात; रणजी स्पर्धेत झळकावले शतक

मुंबई : वृत्तसंस्था

खराब फॉर्मशी झगडणार्‍या अजिंक्य रहाणेने रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमन करताना खणखणीत शतक झळकावले. सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात त्याने 108 धावांची नाबाद शतकी खेळी केली. सर्फराजही 121 धावांवर खेळत आहे आणि मुंबईच्या 3 बाद 263 धावा झाल्या आहेत.

मुंबईची 3 बाद 44 धावा अशी अवस्था झाली असताना अजिंक्य व सर्फराज खान यांनी डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 219 धावांची भागीदारी केली आहे. कर्णधार पृथ्वी शॉ (1) तिसर्‍या षटकांत बाद झाला. त्यापाठोपाठ आकर्षित गोमेल (8) व एसएम यादव (19) हे माघारी परतल्याने मुंबईचा संघ अडचणीत आला होता. अनुभवी अजिंक्यने संयमी खेळ करताना सर्फराजला सोबत घेतले. अजिंक्यने 211 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह शतक पूर्ण केले.

मागील दोन वर्षांत अजिंक्यला टीम इंडियासाठी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्यला 6 डावांत 136 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे निवड समिती व संघ व्यवस्थापनाने त्याला रणजी स्पर्धेत खेळून फॉर्म परत कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तो रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून आज मैदानावर उतरला आणि चेतेश्वर पुजाराच्या सौराष्ट्रविरुद्ध शतकी खेळी केली.

आसामविरुद्ध महाराष्ट्र सुस्थितीत

रोहतक : सलामीवीर पवन शाहच्या नाबाद 165 धावांच्या जोरावर आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राने 5 बाद 278 अशी समाधानकारक मजल मारली होती. पवनने नाबाद दीडशतक केले असले तरी इतर फलंदाजांकडून निराशा झाली. यश नहार (4), राहुल त्रिपाठी (2), कर्णधार अंकित बावणे (27), नौशाद शेख (28) आणि विशांत मोरे (16) यांनी निराशा केली. दिव्यांग हिंगणेकर याने पवनला चांगली साथ दिली. दोघांची भागीदारी शतकाजवळ आली आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दिव्यांग (36) तर पवन (165) धावांवर खेळत होते. आसामकडून मुख्तार हुसेन याने तीन विकेट घेतल्या.

Back to top button