IPL auction 2022 : श्रेयस, शार्दूल, ईशान ‘हॉट फेव्हरिट’; आज महालिलाव | पुढारी

IPL auction 2022 : श्रेयस, शार्दूल, ईशान ‘हॉट फेव्हरिट’; आज महालिलाव

बंगळूर; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL auction 2022 ) महालिलाव शनिवारी होणार असून, श्रेयस अय्यर (shreyas iyer), ईशान किशन ( ishan kishan ), दीपक चहर (deepak chahar) आणि शार्दूल ठाकूर ( shardul thakur )यासारख्या खेळाडूंवर सर्व संघांचे लक्ष असणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंटस् हे नवीन संघ आल्याने दहा संघांचा दोनदिवसीय लिलावात समावेश असणार आहे. लिलावात 590 क्रिकेटपटूंवर बोली लागेल, ज्यामध्ये 227 विदेशी खेळाडू आहेत. यावर्षी दहाहून अधिक खेळाडूंवर दहा कोटींहून अधिकची बोली लागू शकते आणि काही खेळाडू 20 कोटींच्या आसपास जाऊ शकतात. अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो; तर शार्दूल आणि ईशान किशन यांच्यावरदेखील चांगली बोली लागू शकते. या तिन्ही खेळाडूंसाठी फ्रेंचायझींमध्ये चुरस पाहायला मिळेल. याशिवाय दीपक चहर आणि युजवेंद्र चहल यांनादेखील दहा कोटींहून अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स), विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) आणि रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) यांना संघात कायम ठेवण्यात आले आहे. के. एल. राहुल (17 कोटी) हा रिटेनशनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार अय्यर याच्यावर पंजाब किंग्ज (72 कोटी), सनरायजर्स हैदराबाद (68 कोटी) आणि राजस्थान रॉयल्स (62 कोटी) या संघांच्या नजरा असतील. कोलकाता नाईट रायडर्सच्या नजरादेखील अय्यरवर असतील. वरुण चक्रवर्तीला फिटनेसच्या समस्या असतानादेखील संघाने कायम ठेवले. त्यामुळे लिलावात त्यांच्याकडे 48 कोटी रुपये आहेत. ( IPL auction 2022 )

हा लिलाव मोठा असल्याने संघांना कमीत कमी 18 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू (कॅप आणि अनकॅप) यांना मागणी अधिक असेल. त्यामुळेच गेल्यावर्षी ‘पर्पल कॅप’ जिंकणार्‍या हर्षल पटेलची आधारभूत किंमत दोन कोटी आहे. या रकमेच्या पाच पट किंमत त्याला मिळू शकते. सर्वाधिक विकेट घेणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसर्‍या स्थानी असलेल्या आवेश खानची आधारभूत किंमत 20 लाख रुपये आहे. टी-20 मध्ये फारशी चमक न दाखवणारे रविचंद्रन अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांनादेखील चांगली किंमत मिळू शकते. तर अंबाती रायुडूसारख्या खेळाडूला सात ते आठ कोटी रुपये मिळू शकतात. ( IPL auction 2022 )

विदेशी खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर फॉर्मात आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या या सलामी फलंदाजालादेखील चांगली किंमत मिळेल. वॉर्नरने आपल्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाला जेतेपद मिळवून दिले होते. लखनौ सुपरजायंटस् संघाच्या नजरा त्याच्यावर असतील. वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरकडेदेखील सर्वांचे लक्ष असेल. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.

संघांची आतापर्यंतची स्थिती ( IPL auction 2022 )

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (शिल्लक 57 कोटी)

  • विराट कोहली (15 कोटी)
  • ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी)
  • मोहम्मद सिराज (7 कोटी)

सनरायजर्स हैदराबाद (शिल्लक 68 कोटी)

  • केन विलियमसन (14 कोटी)
  • अब्दुल समद (4 कोटी)
  • उमरान मलिक (4 कोटी)

चेन्नई सुपर किंग्स (शिल्लक 48 कोटी)

  • रवींद्र जडेजा (16 कोटी)
  • महेंद्रसिंग धोनी (12 कोटी)
  • मोईन अली (8 कोटी)
  • ऋतुराज गायकवाड (6 कोटी)

पंजाब किंग्ज (शिल्लक 72 कोटी)

  • मयांक अग्रवाल (12 कोटी)
  • अर्शदीप सिंह (4 कोटी)

मुंबई इंडियन्स (शिल्लक 48 कोटी)

  • रोहित शर्मा (16 कोटी)
  • जसप्रीत बुमराह (12 कोटी)
  • सूर्यकुमार यादव (8 कोटी)
  • कायरन पोलार्ड (6 कोटी)

दिल्ली कॅपिटल्स (शिल्लक 47.50 कोटी)

  • ऋषभ पंत (16 कोटी)
  • अक्षर पटेल (9 कोटी)
  • पृथ्वी शॉ (7.5 कोटी)
  • एनरीच नॉर्जे (6.5 कोटी)

राजस्थान रॉयल्स (शिल्लक 62 कोटी)

  • संजू सॅमसन (14 कोटी)
  • जोस बटलर (10 कोटी)
  • यशस्वी जैस्वाल (4 कोटी)

लखनौ सुपरजायंटस् (शिल्लक 59 कोटी)

  • के. एल. राहुल (17 कोटी)
  • मार्क्स स्टोईनिस (9.2 कोटी)
  • रवी बिश्नोई (4 कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स (शिल्लक 48 कोटी)

  • आंद्रे रसेल (12 कोटी)
  • वरुण चक्रवर्ती (8 कोटी)
  • वेंकटेश अय्यर (8 कोटी)
  • सुनील नारायण (6 कोटी)

अहमदाबाद (शिल्लक 52 कोटी)

  • हार्दिक पंड्या (15 कोटी)
  • राशिद खान (15 कोटी)
  • शुभमन गिल (8 कोटी)

Back to top button