Ranji Trophy : 17 फेब्रुवारीपासून रंगणार रणजी चषक स्पर्धेचा थरार

Ranji Trophy : 17 फेब्रुवारीपासून रंगणार रणजी चषक स्पर्धेचा थरार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जैवसुरक्षित वातावरणात 38 संघांमध्ये 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या (Ranji Trophy) आयोजनाची तयारी करत आहे. तत्पूर्वी, स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वांना पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. संघाच्या सदस्यांची संख्या 30 पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये सहयोगी स्टाफचादेखील समावेश असेल. रणजी ट्रॉफीचे आयोजन दोन सत्रांत करण्यात येणार आहे. जे 'आयपीएल'पूर्वी आणि नंतर होईल.

पुजारा, रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा (Ranji Trophy)

बोर्डाने जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार प्रत्येक संघात सर्वाधिक 30 सदस्य असतील, ज्यामध्ये कमीत कमी 20 खेळाडू असतील. संघासोबत जास्तीत जास्त 10 सहयोगी स्टाफ असू शकतो. यासोबतच संघ आपल्यासोबत दोन कोव्हिड रिझर्व्ह खेळाडू ठेवू शकतो. गतविजेता सौराष्ट्र आणि मुंबईदरम्यान होणार्‍या पहिल्या फेरीतील सामन्यावर सर्वांच्या नजरा असतील. कारण, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे एकमेकांसमोर असणार आहेत. खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या या दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल आणि रणजी स्पर्धेतील शतक त्यांची कसोटी कारकीर्द पुन्हा योग्य दिशेला नेऊ शकते.

आजपासून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आयसोलेशनमध्ये (Ranji Trophy)

सर्व संघ आपल्या संबंधित आयोजन स्थळावर 10 फेब्रुवारीला पोहोचतील. यानंतर खेळाडू पाच दिवस क्वारंटाईनमध्ये असतील. यादरम्यान दुसर्‍या आणि पाचव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी होईल. संघांकडे सरावासाठी 15 आणि 16 फेब्रुवारी असे दोन दिवस असतील. उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्राला 11 मार्चपासून सुरुवात होईल, जे पाच दिवसांचे सामने असतील. या फेरीत सहभागी होणार्‍या संघांना चार दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. रणजी ट्रॉफीचे दुसरे सत्र 30 मेपासून खेळविण्यात येईल, ज्यामध्ये उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.

'बीसीसीआय'कडून खेळाडूंच्या मानधनात वाढ

'बीसीसीआय'ने यासोबतच मानधनातदेखील वाढ केली आहे. सामन्याच्या प्रत्येक दिवशी एक लाख 25 हजार खेळाडूंना मिळतील. यापूर्वी पूर्ण सामन्यांसाठी पाच लाख रुपये दिले जात होते. स्पर्धेसाठी 32 संघांना चार संघांच्या आठ गटांत विभागण्यात आले आहे. तर प्लेट गटात सहा संघ असतील. उपउपांत्यपूर्व सामना पात्रता मिळवणारा सर्वात कमी रँकिंग असलेला एलिट संघ आणि प्लेट गटात अव्वल स्थानी असलेल्या संघात होईल. पहिल्या सत्रात 57, तर दुसर्‍या सत्रात सात सामने होतील. स्पर्धेचे आयोजन राजकोट, कटक, अहमदाबाद, चेन्नई, तिरुवनंतपूरम, दिल्ली, हरियाणा, गुवाहाटी आणि कोलकाता येथे होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news