टी-20 विश्वचषक 2022 : भारत-पाक सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच ‘खल्लास’ | पुढारी

टी-20 विश्वचषक 2022 : भारत-पाक सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच ‘खल्लास’

मेलबर्न ; वृत्तसंस्था : यंदा ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरतो. हे दोन्ही संघ भिडतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. तिकीट खरेदीतही तेच दिसून आले. टी-20 विश्वचषक 2022 मधील भारत-पाकिस्तान सामना मेलबर्न येथे होणार आहे, या सामन्याची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली.

ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने तिकीट खरेदी करता येणार आहे. ही तिकिटे स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह 45 सामन्यांची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 टप्प्यासाठी मुलांचे तिकीट पाच डॉलर्स आहे, तर प्रौढांचे तिकीट 20 डॉलर्स आहे.

विश्वचषकाचे सामने अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, जिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच म्हणाला, आयसीसी टी-20 विश्वचषक शानदार असेल. प्रेक्षकांसमोर विजेतेपद राखण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

Back to top button