Team India : संघनिवडीचा घोळ संघरचनेच्या मुळावर | पुढारी

Team India : संघनिवडीचा घोळ संघरचनेच्या मुळावर

भारताला (Team India) द. आफ्रिका संघाने एक दिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिला. व्हाईट चेंडूच्या खेळाचे राजे असलेल्या आपल्या संघाची अवस्था व्हाईट वॉशपर्यंत का आली? एक दिवसीय सामन्याच्या मालिकांचा गेल्या दोन वर्षांतील आढावा घेतला तर 2019-20 ला न्यूझीलंडमध्ये 3-0, 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात 2-1 आणि आता द. आफ्रिकेत पुन्हा 3-0 अशा मालिका आपण परदेशी गमावल्या. श्रीलंकेतआणि मायदेशात इंग्लंड विरुद्ध आपण मालिका जिंकल्या.

टी-20 मध्ये दुबईला विश्वचषकातून बाहेर पडल्यावरचे दुबळ्या संघांविरुद्धचे विजय आणि मायदेशात न्यूझीलंडविरुद्धचा मालिका विजय हे बघता ऐरणीवरचा प्रश्न आहे तो या वर्षाच्या उत्तरार्धात होणार्‍या टी-20 विश्वचषकासाठी आपण तयार आहोत का? 2011 च्या विश्वचषकाची बांधणी धोनीने 2008 पासून केली होती. अर्थात, कर्णधारच्या हाती संघाचे सुकाणू दिले असले तरी जो संघ त्याला दिला जातो त्यात विश्वचषक विजेते बनायची क्षमता आहे का, हाही अभ्यासाचा विषय आहे.

हा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात आहे आणि परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे; पण एकूणच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ निवड ही अजब आहे. जरी विश्वचषक टी-20 चा असला तरी त्या संघातील संभाव्य खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या सामन्यांचा जास्तीत जास्त सराव मिळाला तर भले होईल. एकीकडे नव्या रक्ताला वाव देत आपण दुसरी किंवा तिसरी फळी तयार करायच्या गोष्टी करतो आणि सामन्यात मात्र या नव्या चेहर्‍यांना संधी देत नाही.

या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आपण ऋतुराज गायकवाड, ईशान किशन यांना घेऊन गेलो; पण एकही सामना खेळवू शकलो नाही. विश्वचषकासाठी भारतीय संघाची (Team India) फलंदाजी ही रोहित शर्मा, कोहली, राहुल आणि पंत या चार प्रमुख आणि ज्यांचे संघात स्थान नक्की आहे अशा या अनुभवी फलंदाजांवर अवलंबून असेल. त्यांच्याभोवती आपल्याला ऑस्ट्रेलियात खेळू शकतील अशा फलंदाजांची दुसरी फळी तयार करायची आहे.

यात सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, पृथ्वी शॉ यांच्यासारखे खेळाडू असतील आणि शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल सारख्या युवा खेळाडूंची तिसरी फळी असेल. त्याचप्रमाणे आपल्याला गोलंदाजीत म्हणजे बुमराह, शमी, सिराज, ठाकूर, जडेजा आणि अश्विन यांच्याभोवती आपल्याला दीपक चहर, आवेश खान, हर्षल पटेल, अक्सर पटेल, चहल इत्यादींची फळी तयार ठेवायची आहे.

यासाठी या संभाव्य फलंदाज आणि गोलंदाजांना आपल्याला रोटेशन पद्धतीवर खेळवणे गरजेचे पडते; पण या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपल्या कारकिर्दीच्या शेवटाकडे झुकलेल्या भुवनेश्वर कुमारला खेळवायचा अट्टाहास दुसर्‍याच सामन्यात आपल्या अंगाशी आला. भुवनेश्वर कुमार हा आपला स्विंग गोलंदाजी करणारा गोलंदाज होता ही आता दंतकथा वाटायला लागली आहे. दीपक चहर संधीची वाटच बघत होता. ती संधी तिसर्‍या सामन्यात मिळाल्यावर त्याने स्विंग दाखवला आणि फलंदाजीतली चुणूकही दाखवत सामना जवळपास जिंकून दिला होता.

2021 च्या टी-20 विश्वचषकात आपण 24 ऑक्टोबरला पाकिस्तानकडून पराभूत होऊन सुरुवात केली. आता बरोबर एक वर्षाने म्हणजे 23 ऑक्टोबरला आपण पुन्हा पाकिस्तानशी मेलबर्नला विश्वचषकाची सुरुवात करणार आहोत. गेल्या वर्षीच्या इतिहासाची पुनरावृत्ती नको असेल तर पुढच्या 8 महिन्यांत होणार्‍या सर्व दौर्‍यांना योग्य खेळाडूंना पुरेपूर संधी मिळणे गरजेचे आहे.

Back to top button