SA vs IND 3rd test : ऋषभचे खणखणीत शतक | पुढारी

SA vs IND 3rd test : ऋषभचे खणखणीत शतक

केपटाऊन ; वृत्तसंस्था : फलंदाजीस अवघड असलेल्या (SA vs IND 3rd test) न्यूलँडच्या खेळपट्टीवर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 198 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील 13 धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऋषभ पंतने अतिशय कठीण परिस्थितीत समयोचित खेळी करून शतक साकारले. मधल्या फळीत त्याने विराटसोबत 92 धावांची मौल्यवान भागीदारीही रचली. मार्को जेन्सेनने 4 बळी टिपले.

भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल दुसर्‍या डावातही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जेन्सेनने त्याला 10 धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर, मयंक अग्रवाल (7) धावांवर कॅगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले.

गुरुवारी भारताने 2 बाद 57 वरून पुढे खेळ सुरू केला. मात्र, जेन्सेनने बुधवारचा नाबाद फलंदाज पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक 9 धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु, तोसुद्धा पुन्हा अपयशी ठरला. रबाडाने रहाणेला (1) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला.

त्याने कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी केली. विराट संयमी तर पंत आक्रमक खेळला. जेन्सेनला फटका खेळत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले अर्धशतक फलकावर लावले. शतकी भागीदारीला काही धावा शिल्लक असताना एन्गिडीने विराटला तंबूचा मार्ग दाखवला. विराटने 29 धावांचे योगदान दिले. 152 धावांवर भारताचे 5 गडी तंबूत परतले होते.

विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी आली. त्याने प्राणपणाने किल्ला लढवला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने संघाची आघाडी दोनशेपार पोहोचवली. अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लवकर तंबूत धाडले. 9 गडी बाद झाले असताना ऋषभने आपले शतक पूर्ण केले.

जेन्सेनने जसप्रीत बुमराहला झेलबाद करीत भारताचा डाव 67.3 षटकांत 198 धावांवर संपुष्टात आणला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले. पंतने 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. तर, आफ्रिकेकडून जेन्सेनने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर, रबाडा आणि एन्गिडी यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले.

भारत प. डाव : 223 धावा. द. आफ्रिका प. डाव : सर्वबाद 210 धावा. (SA vs IND 3rd test)

भारत दु. डाव : राहुल झे. मार्कराम गो. जेन्सेन 10, मयंक झे. एल्गर गो. रबाडा 7, पुजारा झे. पीटरसन गो. जेन्सेन 9, कोहली झे. मार्कराम गो. एन्गिडी 29. अजिंक्य रहाणे झे. एल्गर गो. रबाडा 1, ऋषभ पंत नाबाद 100, आर. अश्विन झे. जेन्सेन गो. एन्गिडी 7, शार्दुल ठाकूर झे. वर्नेन गो. एन्गिडी 5, उमेश यादव झे. वर्नेन गो. रबाडा 0, मो. शमी झे. डुसेन गो. जेन्सेन 0, जसप्रीत बुमराह झे. बवुमा गो. जेन्सेन 2. अवांतर 28, एकूण 67.3 षटकांत सर्वबाद 198 धावा.

गडी बाद क्रम : 1/20, 2/24, 3/57, 4/58, 5/152, 6/ 162, 7/170, 8/180, 9/189, 10/198. गोलंदाजी : रबाडा 17-5-53-3, ऑलिव्हर 10-1-58-0, जेन्सेन 19.3-6-36-4, एन्गिडी 14-5-21-3, केशव 7-1-33-0.

Back to top button