केपटाऊन ; वृत्तसंस्था : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs RSA 3rd Test) यांच्यात सुरू असलेली तिसरी आणि निर्णायक कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात तिसर्या दिवसअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. विजयी लक्ष्यापासून अजूनही ते 111 धावांनी मागे आहेत. आफ्रिकेने सुरुवातीला एडन मार्कराम आणि दिवसअखेर कर्णधार डीन एल्गरला गमावले. भारताचा दुसरा डाव आज 198 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून ऋषभ पंतने झुंजार शतकी (नाबाद 100) खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने केलेल्या खणखणीत शतकाच्या जोरावर भारताने दुसर्या डावात 198 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावातील 13 धावांच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य दिले.
भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर एडन मार्करामला स्वस्तात तंबूत धाडण्यात मोहम्मद शमीला यश आले. मार्करामने 16 धावा केल्या. त्यानंतर फॉर्मात असलेल्या कीगन पीटरसनने डीन एल्गरसोबत संघाची धावसंख्या वाढवली. या दोघांनी आफ्रिकेचे शतक पूर्ण केले. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने टाकलेल्या 21व्या षटकात एल्गरला जीवदान मिळाले; पण त्याला फायदा उचलता आला नाही. जसप्रीत बुमराहने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. एल्गरने 3 चौकारांसह 30 धावा केल्या. तिसर्या दिवसअखेर पीटरसन 7 चौकारांसह 48 धावांवर नाबाद आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी भारताने 2 बाद 57 वरून पुढे खेळ सुरू केला. मात्र, जेन्सेनने बुधवारचा नाबाद फलंदाज पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक 9 धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु, तोसुद्धा पुन्हा अपयशी ठरला. रबाडाने रहाणेला (1) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी केली. विराट संयमी तर पंत आक्रमक खेळला.
जेन्सेनला फटका खेळत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले अर्धशतक फलकावर लावले. शतकी भागीदारीला काही धावा शिल्लक असताना एन्गिडीने विराटला तंबूचा मार्ग दाखवला. विराटने 29 धावांचे योगदान दिले. 152 धावांवर भारताचे 5 गडी तंबूत परतले होते. विराट बाद झाल्यानंतर ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी आली. त्याने प्राणपणाने किल्ला लढवला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने संघाची आघाडी दोनशेपार पोहोचवली. अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लवकर तंबूत धाडले.
9 गडी बाद झाले असताना ऋषभने आपले शतक पूर्ण केले. जेन्सेनने जसप्रीत बुमराहला झेलबाद करीत भारताचा डाव 67.3 षटकांत 198 धावांवर संपुष्टात आणला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले. पंतने 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली. तर, आफ्रिकेकडून जेन्सेनने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर, रबाडा आणि एन्गिडी यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले.
पुजारा आणि रहाणेची शेवटची खेळी? (IND vs RSA 3rd Test )
चेतेश्वर पुजारा (9) आणि पाठोपाठ रहाणे (1) देखील दुसर्याच षटकात बाद झाला. अनेकांनी दोघांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून या दोघांना संघातून वगळून नव्या खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. गेली अनेक दिवस चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे कदाचित ही पुजारा आणि रहाणेची शेवटची खेळी ठरू शकते, असे देखील मानले जात आहे. हनुमा विहारी, श्रेयश अय्यर, शुभमन गिल यासारख्या खेळाडूंना संधी मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
भारत प. डाव : 223 धावा. द. आफ्रिका प. डाव : सर्वबाद 210 धावा. (IND vs RSA 3rd Test )
भारत दु. डाव : राहुल झे. मार्कराम गो. जेन्सेन 10, मयंक झे. एल्गर गो. रबाडा 7, पुजारा झे. पीटरसन गो. जेन्सेन 9, कोहली झे. मार्कराम गो. एन्गिडी 29. अजिंक्य रहाणे झे. एल्गर गो. रबाडा 1, ऋषभ पंत नाबाद 100, आर. अश्विन झे. जेन्सेन गो. एन्गिडी 7, शार्दुल ठाकूर झे. वर्नेन गो. एन्गिडी 5, उमेश यादव झे. वर्नेन गो. रबाडा 0, मो. शमी झे. डुसेन गो. जेन्सेन 0, जसप्रीत बुमराह झे. बवुमा गो. जेन्सेन 2. अवांतर 28, एकूण 67.3 षटकांत सर्वबाद 198 धावा.
गडी बाद क्रम : 1/20, 2/24, 3/57, 4/58, 5/152, 6/ 162, 7/170, 8/180, 9/189, 10/198. गोलंदाजी : रबाडा 17-5-53-3, ऑलिव्हर 10-1-58-0, जेन्सेन 19.3-6-36-4, एन्गिडी 14-5-21-3, केशव 7-1-33-0. द. आफ्रिका दु. डाव : 2 बाद 101 धावा.