Ind vs SA 3rd Test : जसप्रीत बुमराहने केली डीन एल्गरची शिकार, द. आफ्रिकेला पहिला झटका | पुढारी

Ind vs SA 3rd Test : जसप्रीत बुमराहने केली डीन एल्गरची शिकार, द. आफ्रिकेला पहिला झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क

केपटाऊन कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 223 धावांवर आटोपल्यानंतर द. आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली. पण त्यांची 4.4 व्या षटकात पहिली विकेट पडली. कर्णधार डीन एल्गरला (3) जसप्रीत बुमराहने बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांची धावसंख्या 1 बाद 17 आहे. एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज क्रीजवर आहेत.

Image

दरम्यान, तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 223 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. याशिवाय चेतेश्वर पुजाराने 43 धावांची खेळी खेळली. नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. केएल राहुल (12) आणि मयंक अग्रवाल (15) फार काही करू शकले नाहीत. पुजाराने कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. पुजारा 43 धावा करून बाद झाला.

यानंतर अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला आणि 9 धावा करून बाद झाला. यानंतर कोहलीने ऋषभ पंतसोबत 113 चेंडूत पाचव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. पंत 27 धावा करून बाद झाला. याशिवाय कोहलीने शार्दुल ठाकूरसोबत 30 चेंडूत 30 धावांची झटपट भागीदारी केली. शार्दुलने 12 धावांची खेळी केली.

रविचंद्रन अश्विन (2), जसप्रीत बुमराह (0) आणि मोहम्मद शमी (7) यांना फारसे काही करता आले नाही. उमेश यादव 4 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने 4 बळी घेतले. याशिवाय मार्को जेन्सनने तीन विकेट घेतल्या. दुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Image

शमी बाद…

77.3 व्या षटकात लुंगी एन्गिडी शमीला (७) बाद करून भारताचा ऑलआऊट केला. यावबरोबर केपटाऊन कसोटीत भारताचा पहिला डाव 223 धावांत संपुष्टात आला.

कोहली 79 धावा करून बाद…

211 धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताला नववा धक्का बसला. चांगली फलंदाजी करणारा कर्णधार विराट कोहली 79 धावा करून बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने यष्टिरक्षक व्हेरेनच्या हाती झेलबाद केले. आपल्या खेळीत कोहलीने 201 चेंडू खेळले आणि 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. गेल्या दोन वर्षांतील कोहलीची ही सर्वोच्च खेळी आहे. रबाडाची ही चौथी विकेट आहे. यापूर्वी त्याने मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराहला बाद केले आहे. याशिवाय मार्को जेन्सनने तीन बळी घेतले.

भारताला आठवा झटका…

70.5 व्या षटकात भारताने आठवी विकेट गमावली. जसप्रीत बुमराहला रबडाने माघारी धाडले. बुमराहला भोपळाही फोडता आला नाही.

भारताला सातवा झटका…

भारताला 205 धावांवर सातवा धक्का बसला. शार्दुल ठाकूर 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला फिरकी गोलंदाज केशव महाराजने कीगन पीटरसनकरवी झेलबाद केले. शार्दुलनंतर जसप्रीत बुमराह क्रीजवर आला. या कसोटीत फिरकीपटूने घेतलेली ही पहिली विकेट आहे. तर महाराजने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शेवटच्या पाच कसोटीत घेतलेली ही पहिली विकेट आहे. त्याने 17 जानेवारी 2020 रोजी घरच्या मैदानावर शेवटची विकेट घेतली. त्यावेळी त्याने इंग्लंडच्या मार्क वुडला बाद केले.

टीम इंडियाला सहावा धक्का…

175 धावसंख्येवर भारताची सहावी विकेट आर. अश्विनच्या रुपात पडली. मार्को जेन्सने 62.5 व्या षटकात अश्विनला (2) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेटकीपर व्हेरेनने अश्विनचा झेल पकडला. जेन्सनने ऑफ स्‍टंपच्या जवळ गुड लेंथ चेंडू टाकला. हा चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता. पण अश्विनने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चेंडू बॅटची कडा घेवून विकेटकीपरच्या हातात गेला.

ऋषभ पंत बाद, भारताचा निम्मा संघ तंबूत…

मार्को जेन्सनने 60.3 व्या षटकात ऋषभ पंतचा अडसर दूर केला. जेन्सने चौथ्या विकेटवर गुड लेंथ चेंडू टाकला. याला कट करण्याच्या नादात चेंडू पंतच्या बॅटला लागून गलीमध्ये गेला. हवेत राहिलेला चेंडू तिथे उभा असणा-या केगन पिटरसनने आरमात पकडला. यचबरोबर पंत झेलबाद झाला. पंतने 50 चेंडूत 27 धावा केल्या. त्याने कर्णधार कोहलीसह 51 धावांची भागिदारी केली.

विराट कोहलीचे अर्धशतक…

59.5 व्या षटकात विराटने ऑलिव्हियरला चौकार लगावून या सीरिजमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे 28 वे अर्धशतक आहे. तर त्याचे सध्याच्या मालिकेतील पहिले अर्धशतकही आहे. कोहलीने 158 चेंडूंचा सामना करत एका चौकारासह 50 धावांचा टप्पा गाठला. त्याने शेवटचे अर्धशतक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध केले होते.

चहपाननंतर खेळ सुरू…

चहापानानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत मैदानात उतरले. दोघे संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवत आहेत.

चहापानापर्यंत भारत 141/4

चहापानाच्या वेळेपर्यंत भारतीय संघाने 54 षटकांत 4 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. विराट कोहली 40 आणि ऋषभ पंत 12 धावांवर खेळत होते. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली होती. विराट कोहलीने 139 चेंडूंचा सामना केला आणि त्यातील 72 चेंडू यष्टीरक्षकाकडे जाऊ दिले. त्याने 2017 नंतर पहिल्यांदा एका डावात सर्वाधिक चेंडू सोडले आहेत. यापूर्वी 2018 च्या मलबर्न कसोटीत त्याने 204 पैकी 69 चेंडू विकेटकीपरकडे जाऊ दिले होते.

रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला

भारतीय संघाला अजिंक्य रहाणेच्या रुपात चौथा धक्का बसला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 116 होती. रहाणेने 12 चेंडूत 9 धावा केल्या. त्याला 42.1 व्या षटकात कागिसो रबाडाने यष्टिरक्षक रेनच्या हाती झेलबाद केले. रबडाची ही दुसरी विकेट आहे.

Image

पुजाराचा खराब रेकॉर्ड…

पुजाराला गेल्या 13 डावांमध्ये कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावता आलेले नाही. पहिल्या डावात त्याने चेन्नईत इंग्लंडविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 73 धावांची खेळी खेळली होती.
कसोटीतील पहिल्या डावात पुजाराची वैयक्तिक धावसंख्या पुढीलप्रमाणे आहे – 21, 0, 17, 8, 4, 9, 1, 4, 26, 0, 0, 3, 43

चेतेश्वर पुजारा बाद…

95 धावांच्या एकूण धावसंख्येवर भारताला तिसरा धक्का बसला. संयमी फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक व्हेरिनने झेलबाद केले. पुजाराचे अर्धशतक हुकले आणि तो 43 धावांवर बाद झाला. त्याने आणि विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला.

Image

लंचनंतर खेळास सुरूवात… कोहली-पुजाराची अर्धशतकी खेळी

लंचनंतर पहिल्या दिवसाच्या दुस-या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. कोहली आणि पुजारा मैदानावर आले. दोघा फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दोघांनी संयमी खेळी केली आणि अर्धशतकी भागिदारीचा टप्पा पूर्ण केला.

लंचपर्यंत पुजारा-कोहली क्रीजवर…

लंच ब्रेकपर्यंत भारताने दोन गडी गमावून 75 धावा केल्या. यावेळी चेतेश्वर पुजारा 26 आणि विराट कोहली 15 धवांवर खेळत होते. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी झाली. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 33 धावांवर दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. राहुल 12 धावांवर बाद झाला. डुआन ऑलिव्हियरने यष्टिरक्षक व्हेरेनकरवी त्याला झेलबाद केले. तर मयंकला 35 चेंडूत 15 धावा करता आल्या. त्याला कागिसो रबाडाने एडन मार्करामकरवी झेलबाद केले.

भारताला दुसरा झटका..

राहुल बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात (१२.२) मयंक अग्रवाल माघारी परतला. रबाडाने त्याला बाद केले. मयंकने ३५ चेंडूत १५ धावा केल्या. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ३३ होती.

भारताला पहिला झटका

डुआन ऑलिव्हियरने टीम इंडियाला पहिला झटका दिला. त्याने ११.२ व्या षटकात केएल राहुल माघारी धाडले. राहुलने ३५ चेंडूत १२ धावा केल्या. विकेटकीपर व्हेरीनने त्याचा झेल पकडला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या ३१ होती.

Image

नियोजित वेळेत सामना सुरू…

पाऊस थांबल्यानंतर सामना नियोजित वेळेत सुरू झाला. भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल क्रीजवर आले. तर कागिसो रबाडाने पहिले षटक फेकले. पहिल्या षटकात भारताने एकही विकेट न गमावता सहा धावा केल्या.

टॉसनंतर हलका पाऊस

टॉसनंतर केपटाऊनमध्ये हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर ग्राउंड व्यवस्थापनाने झटपट खेळपट्टी झाकली. पाऊस फारसा जोरात नव्हता आणि लगेच थांबला. पण हलक्या हवेत आर्द्रता राहणार आहे. याचा फायदा आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज सुरुवातीला घेऊ शकतात.

Image

भारताने सलग तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली खेळत आहे. पाठदुखीमुळे तो शेवटचा सामना खेळू शकला नाही. गेल्या सामन्यात त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. हनुमा तिसरी कसोटी खेळत नाहीये. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीदरम्यान सिराजला दुखापत झाली आणि संपूर्ण सामन्यात तो नीट गोलंदाजी करू शकला नाही. यानंतर तो संघाबाहेर होणार हे निश्चित होते, मात्र त्याच्या जागी इशांत शर्माला संधी दिली जाईल, असा विश्वास माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला. मात्र, कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक द्रविड यांनी उमेशला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Image

विराट ८ हजार धावा पूर्ण करू शकतो..

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात १४६ धावा करू शकला तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करेल. या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत पाच भारतीय फलंदाजांनी ८००० धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर १५९२१ धावांसह आघाडीवर आहे. यानंतर राहुल द्रविड १३२६५, सुनील गावसकर १०१२२, व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ आणि वीरेंद्र सेहवागने ८५०३ धावा केल्या आहेत.

द. आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रायसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेना (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.

भारत प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

 

Back to top button