

केपटाऊन ; वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी (SA vs IND third test ) सामना मंगळवारपासून सुरू होणार असून, दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताला पहिल्यांदा मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसर्या कसोटीत यजमानांनी विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भारतासमोर आव्हान सोपे नसेल. सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या लढतीत कोहली खेळणार आहे.
कोहली आपला 99 वा कसोटी सामना मुलीच्या पहिल्या वाढदिवसाआधी खेळणार आहे. गेल्या काही काळापासून कोहली दबावाचा सामना करीत आहे. त्यामुळे या लढतीत चांगल्या कामगिरीचा त्याचा प्रयत्न असेल. भारताने दक्षिण आफ्रिकेत मालिका (SA vs IND third test) जिंकल्यास कोहलीचे नाव पारंपरिक प्रकारात देशातील महान कर्णधारांमध्ये गणले जाईल.
यासाठी भारताला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबतच पहिल्या डावात 300 हून अधिकची धावसंख्या उभारणे देखील महत्त्वाचे असेल. कोहली संघात असल्याने विरोधी संघावर मनोवैज्ञानिक दबाव निर्माण होतो. कोहलीचा फॉर्म चांगला नसला तरीही तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे हे विसरून चालणार नाही.
जोहान्सबर्गमध्ये दुसर्या डावात नाबाद 40 धावा केल्यानंतर देखील हनुमा विहारीच्या हाती निराशा येऊ शकते. कोहली संघात आल्यास त्याला संघाबाहेर जावे लागणे जवळपास निश्चित आहे. कोहलीकडून भारताला दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे. त्याची खेळण्याची शैली वेगळी आहे. ऋषभ पंत हा जलदगती गोलंदाजांना पुढे येऊन आक्रमकतेने खेळत आहे; पण त्याचा फायदा त्याला झालेला नाही.
न्यूलँडस्च्या खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजांना कॅगिसो रबाडा, डुआने ओलिव्हियर, लुंगी एन्गिडी आणि मार्को जेन्सेन विरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. भारताने केपटाऊनमध्ये कधीही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे मधल्या फळीतील तीन अनुभवी फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल.
पुजारा आणि रहाणेला दुसर्या कसोटीच्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर अंतिम संघामध्ये स्थान मिळू शकते; पण या लढतीत त्यांनी चमक दाखवली नाही तर, त्यांची कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA vs IND third test) संघाला चांगली सुरुवात द्यावी लागेल.
जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या टप्प्यात आहे आणि मोहम्मद सिराजला पायांच्या स्नायूची दुखापत झाल्याने त्याला संधी मिळू शकते. मात्र, संघाला जसप्रीत बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.