धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण | पुढारी

धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण

धुळे – यशवंत हरणे

धुळे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदार संघ काँग्रेसनेच मागून घ्यावा, अशी आग्रही मागणी पुढे आली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातदेखील अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केल्यास या जागेवरून वाद होण्याची दाट शक्यता आहे.

धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि सटाणा असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे या मतदार संघाचा प्रभाव हा धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील राजकारणावर होतो. गेल्या वीस वर्षांपासून या मतदार संघावर भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकवला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आता काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत इच्छुकांची नावे पुढे आली आहे. यात आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे यांची नावे पुढे असून नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या नावावर चर्चा झाली आहे. दोन वेळेस आमदार अमरीशभाई पटेल तर एका वेळेस आमदार कुणाल पाटील यांनी भाजपला लढत दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चर्चेतून धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता दिसते आहे. त्यामुळे एकप्रकारे आघाडीतही त्यावरूद वाद होण्याची चिन्हे आहेत.

या मतदारसंघात यापूर्वी शिवसेना भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे होती. त्यामुळे त्याचा लाभ विजयासाठी झाला. पण आता शिवसेना विभागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या नावाने धुळे मतदारसंघात अनेक वेळेस भावी खासदार असे फलक झळकवण्यात आले. धुळे मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केल्यास आश्चर्य वाटायला नको. भाजपाची सत्ता असलेल्या धुळे मतदार संघाचा गड सहजपणे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यातही धुळे मतदार संघातील धुळे शहर, धुळे तालुका आणि शिंदखेडा मतदारसंघात अद्यापही शिवसेनेच्या शिंदे गटाची पक्ष बांधणी झालेली नाही. या तीनही मतदार संघात त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या भरवशावरच त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे या मतदार संघात बूथस्तरापर्यंत शक्ती असणारा भाजपा हा मतदार संघ शिंदे गटाला सोडण्याची शक्यता नगण्य आहे. डॉ. सुभाष भामरे यांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूला ठेवणे भाजपासाठी घातक ठरू शकते. पण भाजपा दिल्लीश्वरांच्या निर्णयाचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे झालेच तर विद्यमान खासदार भामरे यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. राजकीय तडजोडींमध्ये धुळे लोकसभेची जागा अविष्कार भुसे यांच्याकडे गेलीच तरीदेखील त्यांच्यासमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे. त्यांना एकाच वेळी शिवसेनेचा उद्धव गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तिहेरी पक्षांना तोंड द्यावे लागेल. त्यातच मालेगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवारांना मोजकीच मते मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे उर्वरित पाच मतदार संघामधून विजयी मते घेण्यासाठी भुसे यांना मोठी कसरत करावी लागेल.

Back to top button