पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती | पुढारी

पारंपरिक विरोधकांमध्येच रंगणार लढती

नाशिक : संकेत शुक्ल

निमित्त:

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांसारखीच लढत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही व्हावी आणि समित्यांमध्येही आघाडी विरुद्ध शिंदे गट अशा लढती व्हाव्यात यासाठी राजकीय स्तरावरून बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, स्थानिक स्तरावरील समीकरणे वेगळी असल्याने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत, तर काही ठिकाणी काँग्रेस केवळ नावालाच मैदानात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच होतील, अशी चिन्हे आहेत. याला केवळ सुरगाणा बाजार समितीचा अपवाद आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, माघारीच्या दिवसानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांनीही बाजार समितीच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. आजी – माजी खासदार, आमदार आणि पक्षांचे प्रतिनिधी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने येणारा संपूर्ण आठवडा तसेच राजकीय वातावरण हे बाजार समितीच्या डावपेचांनी तापणार आहे. नाशिक बाजार समितीत पिंगळे, चुंभळे यांचे शह-काटशहाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. राज्यातील राजकारणात दोघांचे वेगळे स्थान असले, तरी स्थानिक स्तरावर मात्र त्यांच्यात असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मनमाड बाजार समितीमध्ये मात्र ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. येथील निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केल्याने ती उत्तरोत्तर रंगणार आहे.

सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे यांचे पॅनल मैदानात आहे. त्यांना भाजप आणि मनसे प्रणीत पॅनलसह माजी आ. राजाभाऊ वाजे यांच्या पॅनलने आव्हान दिले आहे. चांदवडला सत्ताधार्‍यांविरोधात सर्वपक्षीय विरोधकांनी आघाडी केल्याने येथेही राजकीय चूल बाजूला ठेवल्याचे दिसत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये बाजार समितीच्या पहिल्या महिला संचालिका सुवर्णा जगताप यांचाही समावेश आहे. कळवणमध्ये माजी आमदार जे. पी. गावित यांनी घेतलेला यू टर्न आणि परिवर्तन पॅनलला दिलेला पाठिंबा धक्कादायक ठरला आहे. दिंडोरीतही सर्वच पक्षांमध्ये फाटाफूट झाल्याने येथेही पक्षीय समीकरणांना बगल दिली गेल्याचे दिसत आहे. आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार सिमतीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने येथील निवडणूकही प्रतिष्ठेची झाली आहे. आ. दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. विद्यमान पालकमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव बाजार समितीमध्ये तयार झालेल्या पॅनलला पारंपरिक विरोधक असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पॅनलमध्ये होत असलेल्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय समीकरणे बाजूला ठेवत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणार्‍या देवळा बाजार समितीच्या केवळ आठच जागा बिनविरोध झाल्याने येथे 10 जागांसाठी मतदान होणार आहे. नांदगाव बाजार समितीच्या निवडणुकीतून माजी सभापती तेज कवडे यांनी माघार घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

लक्षवेधी लढती
* तालुक्यातील नाशिक बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. यात पक्षीय राजकारणापेक्षा पारंपरिक विरोधक मैदानात असल्याने डावपेचांनी रंगत वाढली आहे.
* पालकमंत्री दादा भुसेलासलगाव बाजार समितीमध्येही माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घातल्याने तेथील लढतीही लक्षवेधी ठरणार आहेत.
* मालेगाव बाजार समितीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. कारण येथे कर्मवीर भाउसाहेब हिरे पॅनल आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये लढत होत आहे.

सुरगण्यात माकपचेच वर्चस्व
सुरगाणा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यात माकपप्रणीत किसान विकास प्रगती पॅनलचे 17 पैकी 16 जागा उमेदवार निवडून आले आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मोहन गांगुर्डे हे एका जागेवर निवडून आले आहेत. माकपने विजयाची परंपरा कायम राखली असून गेल्या 15-20 वर्षांपासून सुरगाणा बाजार समितीवर माकपचे वर्चस्व आहे आणि या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ते दिसून आले आहे.

Back to top button