लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जग बदलाचे तत्त्वज्ञान मांडणारा साहित्यिक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : जग बदलाचे तत्त्वज्ञान मांडणारा साहित्यिक
Published on
Updated on

एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती. त्यानिमित्त…

पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. अशी प्रखर पुरोगामी व श्रमिकनिष्ठ भूमिका घेत. 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव', असा अर्पणभाव व्यक्त करत, जग बदलाचे तत्त्वज्ञान मांडणारे अण्णा भाऊ साठे हे मराठी भाषा आणि साहित्यातील थोर साहित्यकार आहेत. प्रामुख्याने त्यांना लोकशाहीर, लोककलावंत, लोकनाट्यकार परिवर्तनवादी कार्यकर्ते, संयुक्त महाराष्ट्र् चळवळीतील आघाडीचे जननायक, विद्रोही कथाकार व कादंबरीकार म्हणून ओळखले जाते.

अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1920 रोजी वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे झाला. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी स्वयंप्रेरणेतून मूलगामी लेखन केले. 14 कथासंग्रह, 32 कादंबर्‍या, 8 पटकथा, 1 नाटक, 1 प्रवासवर्णन, 14 लोकनाट्ये, 12 पोवाडे, 12 उपहासात्मक लेख, असे विपूल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. 2 मार्च 1958 रोजी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले. एवढ्या लिखाणानंतरही त्यांच्या साहित्याची उपेक्षाच झाली. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्यांची दखल घेतली नाही. मात्र, 1969 मध्ये डॉ. गंगाधर पानतावणे संपादित 'अस्मितादर्श' या त्रैमासिकाने अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त 'अण्णा भाऊ साठे : जीवन व वाङ्मय' हा विशेषांक काढून त्यांच्या क्रांतदर्शी लेखनकार्याची नोंद सर्वप्रथम घेतली.

अण्णा भाऊ साठे हे बिनीचे लेखक होते. त्यांचे समग्र साहित्य म्हणजे भारतीय समाजाचा आरसाच आहे. त्यामध्ये विविध जाती, जमाती, भटके विमुक्त समूह आलेे आहेत. विशेषत: वारणेच्या खोर्‍यातील वाटेगावच्या प्रादेशिकतेचे आणि मुंबईच्या चिरानगरातील आठरापगड जातींचे जगणे त्यांनी चितारले आहे. अण्णाभाऊंचे बहुतांश आयुष्य मुंबईतील झोपडपट्टीमध्ये गेले. लेबर कॅम्पमध्ये राहत असताना तेथील माणसे, त्यांचे जगणे, संघर्ष, सुख-दु:ख अण्णाभाऊंनी जवळून पाहिला होता. यातूनच त्यांचे लेखन निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या कथा-कादंबर्‍या वाटेगाव ते धारावीतील चिरानगरच्या लढवय्या माणसांचे वास्तव जीवनदर्शन घडवितात.

अण्णाभाऊंच्या तीस एक कथा मुंबईतील झोपडपट्टीवर आधारित आहेत. त्यामध्ये 'बरबाद्या कंजारी', 'प्रायश्चित', 'रेडझुंज', 'स्मशानातील सोनं' आणि 'लाडी' या प्रमुख कथांचा समावेश होतो. लोकांच्या कानातील मळ काढून उदरनिर्वाह करणारा, देहाने धिप्पाड असणारा बरबाद्या कंजारी जातपंचायत मानत नाही. तो पारंपरिकतेला नकार देतो. झोपडपट्टीत आजुबाजूची वेगवेगळ्या जातीची माणसे त्याला आपलीच वाटतात. त्यामुळे ग्रामजीवनातील जातीयता येथे बरबाद्या उद्ध्वस्त करतो. ही जग बदलाची नांदीच आहे. 'रेड झुंज' या कथेत दोन दूध व्यावसायिकांमध्ये संघर्ष येतो.

अण्णाभाऊंच्या महानगरीय जीवनातील कथांमध्ये 'स्मशानातील सोनं' ही महत्त्वाची कथा. या कथेत महानगरातील माणसांचा जीवन संघर्ष सामाजिक, आर्थिक पातळीवर गंभीर बनलेला आहे. दगडाच्या खाणीत काम करणारा भीमा खाणकाम बंद पडल्यानंतर असाह्य बनतो. त्यासाठी तो मृत व्यक्तीच्या तोंडात टाकलेले सोने मिळवून चरितार्थ चालवतो. मात्र, एक दिवस प्रेताच्या तोंडात त्याची बोटे अडकून तुटतात. त्याचे जीवन पुन्हा असाह्य बनते. अण्णाभाऊ येथे भीमाचा जगण्याचा संघर्ष मांडतात. वास्तविक तो चिरानगरातील माणसांचा लढा आहे. अण्णाभाऊंच्या कथेतील चिरानगरची ही लढवय्यी माणसे आजही मुंबईतील धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये जगत आहेत. ती गरीब आहेत. भूक, दारिद्य्र, उपासमार, अभावग्रस्तता त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, असे असले तरी ही माणसे जीवनाशी संघर्ष करणारी आहेत. मृत्यूला न घाबरता माणुसकी जपणारी आहेत. त्यांच्या जगण्यातच परस्थितीशी दोन हात करण्याची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात आहे.

अण्णाभाऊंनी कथेबरोबरच कादंबर्‍यातून जग बदलू पाहणार्‍या लढवय्या नायकांची मांडणी केली. 'फकिरा', 'वारणेचा वाघ', 'माकडीचा माळ' इ. कादंबर्‍यांत याची अभिव्यक्ती पाहावयास मिळते. ग्रामीण भवतालाचा पट मांडताना अण्णाभाऊंच्या बहुतांश कादंबर्‍यांमध्ये स्त्रीजीवनाचा मूलगामी शोध आलेला आहे. 'वैजयंता', 'आवडी', 'रत्ना', 'चंदन' या कादंबर्‍यांत तो दिसून येतो. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून तळागाळातील शोषित समूहांचे जगणे मांडले. त्यांची वेदना शब्दबद्ध केली. श्रमिकांच्या जीवनातील मूल्यात्म संघर्ष मांडून त्यांचा विद्रोही आविष्कार घडविला. त्याबरोबरच त्यांचा साहित्यविचार आधुनिक असून त्यात प्रस्थापित साहित्यविचारांची चौकट नाकारून अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र त्यांनी मांडले. एकुणात अण्णाभाऊंचे समग्र साहित्य सामाजिक क्रांतीचा उद्घोष करणारे असून जग बदलाच्या तत्त्वज्ञानाचे ते द्योतक ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news