

पुढारी ऑनलाईन
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 'स्पायडर मॅन ः नो वे होम' हा चित्रपट रीलिज होण्यापूर्वी आतापर्यंत ज्यांनी स्पायडर मॅन तथा पीटर पार्करची भूमिका साकारली, असे तिन्ही स्पायडर मॅन एकत्र दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या आणि तिघांनीही चित्रपट रीलिज होईपर्यंत त्या नाकारल्या होत्या. अर्थात तिघांनाही एकत्र पाहून प्रेक्षकांना सुखद धक्काच बसला होता.
आता एमसीयूच्या आगामी 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस'मध्येही असेच अनेक सुपरहीरो एकत्र दिसू शकतात. 'स्पायडर मॅन नो वे होम'मध्ये दिसले होते की, डॉक्टर स्ट्रेंजमुळे मल्टिव्हर्सचे दरवाजे उघडले गेले आहेत. आता त्याचाच पुढचा भाग 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस'मध्ये पाहायला मिळणार आहे. यात मल्टिव्हर्स ही संकल्पना आणखी तपशिलात असेल. ताज्या माहितीनुसार मार्व्हलचे 'वुल्वरीन' हे कॅरेक्टर आता या डॉक्टर स्ट्रेंजच्या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे. अर्थात हा नवा वुल्वरीन असेल. यापूर्वीच या चित्रपटात नवा आयर्न मॅनही दिसणार असल्याचे समोर आले आहे. तो आयर्न मॅन अभिनेता टॉम क्रूझ साकारत असल्याचीही माहिती आहे.
डॉक्टर स्ट्रेंजच्या या चित्रपटातून अनेक नव्या सुपरहिरोंना इंट्रोड्युस केले जाऊ शकते. त्यामुळेच या चित्रपटात वुल्वरिन असेल पण तो अभिनेता ह्यू जॅकमॅन साकारणार नाही. ज्या प्रमाणे टोनी स्टार्क तथा आयर्न मॅन हे कॅरेक्टर अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनियरसाठीच बनले आहे, असे वाटते अगदी तसाच ह्यू जॅकमॅनचा वुल्वरीनही आहे. 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस' हा चित्रपट 6 मे रोजी प्रदर्शित होत आहे. तोपर्यंत चित्रपटातील कथानकाविषयी अनेक थ्योरीज येत राहतील. पण, खरा उलगडा 6 मे रोजीच होईल.