

पुढारी ऑनलाईन
मार्व्हल स्टुडिओजचा सुपरहीरो डॉ. स्ट्रेंज याचा पुढचा सिनेमा सध्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट 6 मे रोजी रीलिज होणार आहे. नुकताच 'डॉक्टर स्ट्रेंज' या फिल्म फ्रँचायजीतील दुसर्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रीलिज झाला आहे. 'डॉ. स्ट्रेंज इन मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही काळापासून या चित्रपटात मार्व्हलचाच आणखी एक सुपरहीरो पण ज्याचे हक्क फॉक्स स्टुडिओकडे होते तो 'डेडपूल' या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. (अर्थात, फॉक्स स्टुडिओदेखील आता डिस्नीच्या मालकीचा आहे. त्यामुळे 'डेडपूल'वर मार्व्हलची मालकी आलीच आहे.) त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली होती. पण, आता डेडपूल साकारणारा अभिनेता रेयान रेनॉल्डस् यानेच तो 'डॉ. स्ट्रेंज इन द मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस'मध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही अफवाच असल्याचे रेयानने स्पष्ट केले. तथापि, 'डेडपूल'चा तिसरा भाग येतोय हे मात्र नक्की; पण त्याला वेळ लागू शकतो. कारण, मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये सध्या 'थॉर ः लव्ह अँड थंडर', 'ब्लॅक पँथर 2' आणि 'कॅप्टन मार्व्हल 2'वर काम सुरू आहे.