

पुढारी ऑनलाईन डेस्क - अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी पौराणिक मालिकांमध्ये काम करणारे मराठी अभिनेते योगेश महाजन यांचे हार्टॲटॅकने निधन झाले. १९ जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली. महाजन परिवारकडून योगेश महाजन यांची अंत्ययात्रा आज होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी लिहिली, 'आम्हाला खूप दु:खासोबत हे सूचित करावं लागतयं की, अचानक आमचे लाडके योगेश महाजन यांचा मृत्यू झाला.' १९ जानेवारी, २०२५ रोजी त्यांना हार्टॲटॅकने मृत्यू झाला. हे आमच्या संपूर्ण परिवार, नातेवाईक आणि मित्रांसाठी भयानक धक्का आहे.''
योगेश महाजन यांनी वयाच्या ५० व्या वर्षी रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे अखेरचा श्वास घेतला. योगेश महाजन यांनी अनेक मराठी चित्रपटांशिवाय अनेक हिंदी पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे. योगेश हे 'शिव शक्ति-तप, त्याग, तांडव' शूटिंगसाठी उमरगाव येथे होते. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्य यांची भूमिका साकारली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी सायंकाळी 'शिव शक्ति-तप, त्याग, तांडव'चे शूटिंग संपताच योगेश यांचे तब्येत बिघडली. ते डॉक्टरांकडे गेले आणि औषध घेतलं. रात्री ते हॉटेलच्या खोलीत झोपले, पण रविवारी सकाळी ते शूटिंगच्या सेटवर आले नाही. नंतर मालिकेच्या टीमने त्यांना फोन लावण्याचा संपर्क केला. पण, त्यांनी फोन उचलला नाही. जेव्हा त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा ते अंथरुणावर होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली होती.