

the world largest 43rd India Day Parade new york
न्यूयॉर्क – साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’साठी ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड झाली आहे. ‘सर्वे भवंतु सुखिनः’असा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड होणार आहे. १७ ऑगस्ट रोजी मॅडिसन अव्हेन्यूवर नियोजित केल्याचे ‘एफआयए’चे अध्यक्ष सौरिन परिख यांनी सांगितले.
फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA-NY-NJ-CT-NE) ने अलीकडेच न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासात ४३ व्या वार्षिक 'इंडिया डे परेडचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळी भारतीय राजदूत बिनया एस. प्रधान म्हणाले, ''फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने अमेरिकेत भारताची प्रतिमेला उंचावण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. १९८१ मध्ये अत्यंत छोट्या प्रमाणात सुरु झालेली ही परेड आज जगातील सर्वात मोठी 'इंडिया डे सेलिब्रेशन परेड' म्हणून गौरवली जाते.''
१९७० मध्ये स्थापन झालेली एफआयए ही एक प्रमुख स्वयंसेवी संस्था आहे. भारतीय संस्कृतीचा प्रचार, नागरी सहभाग आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी, ती न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडसारखे भव्य कार्यक्रम आयोजित करत असते. या प्रतिष्ठित आणि देशभक्तीपर कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या सहा भाषांमध्ये विशेष संदेश देत लोकांना या कार्यक्रमाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या संपूर्ण उत्सवासाठी ‘क्रिकमॅक्स कनेक्ट’ हे प्रमुख प्रायोजक आहेत.
'परेडच्या व्यवस्थापनाची सर्व कामे स्वयंसेवकांकडून केली जातात.' सौरिन परिख म्हणाले, ''ही परेड ‘पैसे द्या आणि सहभागी व्हा’ अशा प्रकारची नाही. तर ‘अभिमानाने सहभागी होण्याची आहे.''