पुढारी ऑनलाईन डेस्क - थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'वेट्टैयन' ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. या चित्रपटासाठी सुपरस्टार रजनीकांत यांनी दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल सोबत हातमिळवणी केली आहे. चित्रपटाचे शूटिंग रजनीकांत यांनी आधीच संपवले आहे. याची माहिती त्यांनी पोस्ट करून दिली. आता चाहते चित्रपट रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. अखेर निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून अधिकृतरित्या चित्रपटाची रिलीज डेट घोषित केली आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज तारखेच्या घोषणेसोबत चित्रपटाचे नवे पोस्टरदेखील जारी केले आहे. यामध्ये पोलिसाच्या भूमिकेत रजनीकांत यांची झलक पाहायला मिळाली. निर्मात्यांनी घोषणा केली की, 'वेट्टैयन' यावर्षी १० ऑक्टोबर, २०२४ रोजी चित्रपट रिलीज होईल. वृत्तानुसार, चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी आधीच माहिती समोर आली होती. रजनीकांत यांनी अध्यात्मिक प्रवासादरम्यान ही माहिती दिली होती. आता निर्मात्यांनी रिलीज डेटवर शिक्कामोर्तब केले आहे.
चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये रजनीकांत पोलिस वर्दीत धाकड अंदाजात दिसत आहेत. रजनीकांत यांनी काळा गॉगल घातला आहे. पोस्टरवर आंदोलन करणाऱ्या लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. चाहते रिलीज डेटच्या घोषणेनंतर उत्साहित आहेत. आधी निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून माहिती दिली होती की, ते आज, सोमवारी, सकाळी १० वाजता चित्रपटाशी संबंधित महत्वाची घोषणा करतील.
बॉक्स ऑफिसवर १० ऑक्तोबरल 'वेट्टैयन' बॉक्स ऑफिसवर साऊथ सुपस्टारचा चित्रपट 'कंगुवा' सोबत भिडणार आहे. 'कंगुवा' देखील १० ऑक्तोबर रोजी चित्रपटगृहात धुमाकूळ घालायला तयार आहे. 'कंगुवा'मध्ये सूर्या सोबत बॉबी देओल देखील दिसणार आहे. कोरताला शिवा यांनी दिग्दर्शन केले आहे.
'वेट्टैयन' चे दिग्दर्शन 'जय भीम' फेम चित्रपट निर्माते टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे. अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत आहे. रजनीकांत यांच्यासोबत राणा दग्गुबाती, अमिताभ बच्चन, फहद फाजिल, राणा दग्गुबाती, मंजू वारियर, दुशारा विजयन, रितिका सिंह, जीएम सुंदर, रोहिणी, राव रमेश, रमेश थिलक, रक्षण यांच्याही भूमिका आहेत.