

Omkar Bhojane Vardhan Kamat: मराठी अभिनेता ओंकार भोजने हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. ओंकार हा अनप्रोफशनल असून तो चित्रपटाचे प्रमोशन्स करत नाही असा त्याच्यावर आरोप होत आहे. या आरोपांचे उत्तर देण्यासाठी अखेर ओंकारने मित्र म्हणे पॉडकास्ट केला. त्या पॉडकास्टमध्ये त्याने रील स्टार आणि कंटेट क्रिएटर वर्धन कामत यांच्या उमेश या चित्रपटाचा उल्लेख केला होता.
आता वर्धन कामत यांनी हात धागा पकडून आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओच्या सुरूवातीलाच वर्धन कामत यांनी ओंकार भोजनेला अनप्रोफेशनल, पथेटिक म्हणत सर्वांना धक्का दिला. मात्र जसजसा व्हिडिओ पुढे सरकत गेला तसतसे वर्धन यांनी ओंकार भोजने कसा आऊट ऑफ दी बॉक्स जाऊन गोष्टी करतो अन् तो अनप्रोफेशनल नसून या इंडस्ट्रीमधला दुर्मिळ हिरा आहे हे सांगितलं.
वर्धन कामत यांनी उपहासात्मक पद्धतीने केलेल्या व्हिडिओत ओंकार भोजनेची पाठराखण केली आहे. ते म्हणतात, 'ओंकार भोजने अनप्रोफेशनल आणि पॅथेटिक आहे आणि हे विधान चुकीचं नाहीये. २०२४ मध्ये मी माझ्या फॅमिलीसोबत एका स्टुडिओमध्ये गेलो होतो, तिथे ओंकारची रिहर्सल सुरू होती. आणि आम्हाला बघता क्षणी हा स्टेजवरून खाली उतरला, माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, "मी पाहतो तुमचा कंटेंट, मला खूप आवडतो, छान करता तुम्ही." अरे, स्वतःची रिहर्सल सोडून नवख्या कलाकारांना अशी दाद कोणी देतं का? टोटल अनप्रोफेशनल!'
ओंकारला चित्रपट प्रमोशन केलं नाही म्हणून अनप्रोफेशनल म्हणणाऱ्यांना वर्धन यांनी मारलेला टोला होता. ते पुढे म्हणाले, 'स्टुडिओमधून बाहेर पडताना साडीच्या वेषात धावत येऊन मला म्हणाला, "आपण फोटो काढूया." आणि स्वतःचा नंबर देऊन गेला. कोणी करतं का असं?'
वर्धन कामत यांनी त्यांच्या उमेश या चित्रपटाचा किस्सा देखील सांगितला. त्यांना ओंकार भोजनेला या चित्रपटात घ्यायचं होतं. मात्र त्यानं आधीच डेट दिल्या असल्यामुळं त्याने नकरा दिला होता.
याचा किस्सा सांगताना कामत म्हणतात, 'माझ्या 'उमेश' या फिल्मसाठी मी जेव्हा त्याला विचारलं, तेव्हा ऑस्ट्रेलिया टूरच्या आधीच्या कमिटमेंट्समुळे मला नकार दिला त्याने. आणि कहर म्हणजे, गेल्या मे महिन्यात स्वतःहून मला फोन करतो आणि मला सांगतो, "मी गोव्यात येतोय तुझा सिनेमा पाहायला."
वर्धन कामत पुढे म्हणाले, 'आम्ही ना फ्लाईट टिकट्सचे पैसे दिले, ना स्टेची अरेंजमेंट केली. माझ्या घरी येऊन माझ्या खोलीत थांबला. रात्री डिनरसाठी जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेव्हा त्या रेस्टॉरंटने आम्हाला डिनर होस्ट केलं आणि त्या बदल्यात प्रमोशनल बाईट मागितली. तेव्हा हात जोडून हा सांगतो, "मी प्रमोशनल कंटेंट नाही करत, कारण मी इंस्टावर सक्रिय नाहीये."
मात्र हाच प्रमोशनल बाईट नाकारणारा ओंकार दुसऱ्या दिवशी निघण्याआधी माझ्या मुलांसोबत तो रील बनवतो आणि मला कंटेंट लिहायला वेळ पण नाही देत. किती अनप्रोफेशनल!
आणि कळस म्हणजे, 'मित्र म्हणे' या पॉडकास्टवर जाऊन लाखो लोकांसमोर हा माझं आणि माझ्या सिनेमाचं नाव घेतो. असं देखील कामत यांनी आपल्या व्हिडिओत सांगितलं.
मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये ओंकार भोजने म्हणाला होता, "आम्ही गोव्यात गेलो होतो. आमचे ते वर्धन कामत सर म्हणून आहेत, त्यांची एक 'उमेश' नावाची फिल्म बघायला. तर ते आपलेच आहेत म्हणून आम्ही तसेच गेलो होतो तिथे. काय दुसरं काही विचार किंवा दुसरं काही दुसरी गोष्ट नव्हती.'
वर्धन कामत यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हणतात की, 'अरे, आजकाल इंडस्ट्रीत लोकं स्वतःच्या फायद्याशिवाय सख्ख्या भावाचं नाव नाही घेत, तिथे तू एका गोव्यातल्या कलाकाराचं नाव घेतोयस. किती अनप्रोफेशनल!
व्यावहारिक दृष्टीने हे सगळं चुकीचं आहे. पण सिनेमा जर अजूनही माणसांचा आणि संवेदनशीलतेचा प्रांत मानला जात असेल, तर ओंकार अनप्रोफेशनल नाही, ओंकार या बाजारात दुर्मिळ आहे. या बाजाराला कलाकार हवे असतात की हिशोबी विक्रेते, हे ज्याचं त्याने ठरवावं.