

पुढारी ऑनलाईन
तमिळ सुपरस्टार अजित कुमार तथा थला अजितचा नवा चित्रपट 'वलीमाई' 24 फेब्रुवारी रोजी रीलिज होत आहे. बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यांनी प्रमोशनमध्ये या चित्रपटाविषयी आणि अजितविषयी अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, अजितचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो पॅन इंडिया रीलिज होत आहे. अजित हा असा हीरो आहे जो कधीही प्रसारमाध्यमांशी बोलत नाही, पुरस्कार वितरण सोहळ्यांना जात नाही, चित्रपटाच्या मुहूर्तालाही कधीही येत नाही, तरीही त्याची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. कधीतरी चेन्नईला जाऊन बघा, मग कळेल. मी अजितसोबत एक चित्रपट केला होता चित्रपटाचा खेळ रात्री दीडला सुरू झाला.
त्या एकपडदा चित्रपटगृहात एक हजार प्रेक्षकक्षमता होती. थिएटर हाऊसफुल्ल होते आणि थिएटरबाहेर पुढच्या शोजसाठी आलेले 20 हजार लोक बसले होते. दीडनंतर पहाटे 4 वाजता, त्यानंतर सकाळी 7 वाजता अशा रीतीने थिएटर्समध्ये 24 तास चित्रपट सुरू होता.
'वलीमाई' हा एक आंतरराष्ट्रीय लेव्हलचा अॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटाचे चित्रीकरण 150 दिवसांत झाले असू यातील अॅक्शन दृश्यांच्या शूटिंगलाच जवळपास 80 दिवस लागले. काही अॅक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगला तर 20 ते 25 दिवसही लागले. एका दृश्यासाठी तर 4 नव्या कार्सचा स्फोट घडवून आणला गेला. तर जवळपास 200 ते 250 मोटारसायकल्सचा वापर केला गेला आहे. रशियातील शूटिंगवेळी तिथूनच 30 मोटारसायकल विकत घेतल्या होत्या. शूटिंगनंतर त्या निम्म्या किमतीत विकून टाकल्या. एकदा मोटारसायकल उडवताना अजितच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तरीही हा माणूस दुसर्या दिवशी शूटिंगला वेळेवर आला.