

udaipur french tourist rapist arrested bollywood connection
राजस्थानमधील उदयपूर येथे जाहिरात चित्रीकरणासाठी आलेल्या एका फ्रेंच महिलेवर काही दिवसांपूर्वी बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता एका संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार येथील रहिवासी असलेल्या पुष्पराज उर्फ सिद्धार्थ ओझा याच्या मुसक्या आवळ्या. धक्कादायक बाब म्हणजे, हा संशयित आरोपी एक कास्टिंग कंपनी चालवतो आणि त्याने अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांमध्ये कास्टिंग दिग्दर्शकाचे काम केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय सिद्धार्थ ओझा असे आरोपीचे नाव असून, तो 22 जून रोजीच्या घटनेपासून फरार होता. मूळचा चित्तोडगडचा असलेला संशयित उदयपूरमध्ये 'कास्टिंग कॉल' नावाची टॅलेंट ॲक्विझिशन एजन्सी चालवत असे आणि शहरातील जाहिरात चित्रीकरणासाठी कलाकारांची नियुक्ती करत होता.
पीडित महिला काही काळापासून दिल्लीत राहत असून अनेक मॉडेलिंग प्रकल्पांमध्ये सहभागी झाली होती, असेही पोलिसांनी सांगितले. ती कथितरित्या एका जाहिरात चित्रीकरणासाठी उदयपूरमध्ये आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ‘कास्टिंग कॉल’ या कंपनीमार्फत आयोजित चित्रीकरणासाठी पीडित फ्रेंच युवती उदयपूर येथे आली होती. 22 जून रोजी, पिछोला तलाव आणि सज्जनगड किल्ला यांसारख्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. सायंकाळी उशिरा, आरोपी आणि इतर क्रू मेंबर्सनी टायगर हिल येथील ‘द ग्रीक फॉर्म अँड रेस्टो कॅफे’मध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीदरम्यान, पीडितेची भेट घेतली. तेथे संभाषणानंतर, संशयित आरोपीने तिला मोबाईल कंपनीच्या जाहिरात चित्रीकरणाचे आमिष दाखवले आणि चित्रीकरणाचे स्थळ दाखवण्याच्या बहाण्याने सुखेर येथील आपल्या भाड्याच्या फ्लॅटवर नेले, जिथे त्याने बलात्काराचा गुन्हा केला.
हनीट्रॅपचा आरोप
पोलीसांनी सांगितले की, संशयित आरोपीला चित्तोडगड जिल्ह्यातून अटक केल्यानंतर पुष्पराज उर्फ सिद्धार्थ ओझाला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले, तेव्हा सुरुवातीला त्याने आपल्याला हनीट्रॅपच्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा कांगावा केला. इतकेच नव्हे, तर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर त्याने बॉलिवूडमधील काही व्यक्तींवर आपल्याला या प्रकरणात गोवल्याचे गंभीर आरोपही केले. या क्षेत्रातील काही लोकांना आपण हे काम सोडून आपल्या गावी परत जावे, असे वाटत होते, असा दावाही सिद्धार्थने केला. मात्र, पोलिसांनी कठोरपणे चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केल्याचे समोर आले.