

पुढारी ऑनलाईन डेस्क - महाराष्ट्रात सर्वच सण जल्लोषात साजरे होतात पण मराठी सणांचा उत्साह वेगळाच असतो. सध्या सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे मालिकांमध्ये सुद्धा गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. 'तुला जपणार आहे' मालिकेत रामपुरे परिवार एकत्र आला आहे. मंजिरी ठरवते की, यावर्षी गुढी अथर्व आणि माया उभारतील. मायाला मात्र या सगळ्या सोहळ्यामध्ये वेदाचा सहभाग नको आहे म्हणून तिचे प्रयत्न सुरु आहेत. पण तिकडे अशा काही घडामोडी घडतात की, अथर्व आणि मीराच्या हातून गुढी उभारली जाते.
आपला उत्साह व्यक्त करताना मीरा म्हणजेच महिमा म्हात्रे म्हणाली- "मीराने तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे आणि रामपुरेंच्या घरात प्रवेश केला आहे. या नवीन परीवारात ती रुळतेय सर्वाना ओळखू पाहतेय. मीराला लहानपणी हरवलेलं आईच प्रेम बाईसाबांच्या रूपात मिळत आहे. गुढीपाडव्याचा सीन शूट करतानाही आम्ही प्रचंड उत्साहात होतो. परिवारासोबत सण साजरा करण्याचा आनंद 'तुला जपणार आहे' च्या सेटवर ही मिळत होता. आम्ही शूटवर तो दिवस गुढीपाडवा म्हणूनच साजरा केला. मीरा खूप आनंदात आहे तिला दिलेली जबाबदारी ती खूप छानपणे पार पडत आहे. ज्यामुळे तिच्यावर मंजिरी बाईसाहेब खूप खुश आहेत.
मायाच्या भूमिकेत दिसणारी ऋचा गायकवाड म्हणतेय - मायाला, अथर्व आणि घरातल्या सर्व व्यक्तींच्या मनात जागा बनवायची आहे. पण आता त्यात मीरा नावाचं नवीन प्रकरण आले आहे, ते कसं गोड बोलून बाहेर काढता येईल याचा विचार चालू आहे. माया गुढीपडव्यासाठी तयार होते. पुढे काय ते तुम्हाला मालिकेत पाहायला मिळेलच. पण मला पारंपरिक पद्धतींनी तयार व्हायला खूप आवडतं आणि या सीनसाठी नथ, गजरा आणि साडी नेसून मी तयार झाली आहे.
दुसरीकडे, अजीत मायाला जाणीव करून देतोय की, मीरा मायाची जागा घेऊ शकते! दरम्यान मीरा आणि अंबिकामध्ये देखील एकदा मायावरून बोलणं होतं. अंबिका माया कशी वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतेय. मीरा आणि मंजिरीमधलं नातं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. पण अथर्व सोबत मात्र मीराचे खटके उडताहेत.
आता मालिकेत असं काय होणार आहे ज्याने गुढी मीरा आणि अथर्वच्या हातून उभारली जाते? मायाचं सत्य मीरा समोर आणण्यासाठी अंबिकाचे प्रयत्न यशस्वी होतील का? बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वा. झी मराठीवर.