

Triptii Dimri Prabhas Spirit |
दिल्ली : अखेर प्रभासच्या 'स्पिरिट' चित्रपटाला त्याची मुख्य अभिनेत्री सापडली. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. दीपिका पदुकोण चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता तृप्ती डिमरी 'स्पिरिट' ची मुख्य अभिनेत्री असेल. ती प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रभाससोबत ‘स्पिरिट’ या बहुचर्चित चित्रपटात झळकणार असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. एवढंच नव्हे, तर दीपिकाने या चित्रपटासाठी मोठी फी देखील घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर दीपिकाने हा चित्रपट सोडल्याचे समोर आले. मात्र दीपिकाने चित्रपट सोडला की तिला बाहेरचा रस्ता दाखवला, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी अनेक अडचणींनंतर दीपिका पदुकोणला त्यांच्या 'स्पिरिट' चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, दीपिकाने ८ तासांचा वेळ मागितला तेव्हा तणाव सुरू झाला ज्यामुळे तिचा शूटिंगचा वेळ ६ तासांनी कमी झाला. दीपिकाने केवळ तिच्या फीच नव्हे तर चित्रपटाच्या नफ्यात वाटा मागितला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. सूत्रांचा दावा आहे की, ती तिचे संवाद तेलुगूमध्ये बोलण्यास तयार नव्हती, ज्यामुळे शूटिंग करणे अधिक कठीण झाले होते.
शनिवारी संध्याकाळी 'स्पिरिट'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी चित्रपटाच्या नायिकेचे नाव जाहीर केले आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टी-सीरीजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “एक नवीन ऑन-स्क्रीन जोडी आली आहे! प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या आमच्या महत्त्वाकांक्षी 'स्पिरिट' चित्रपटात तृप्ती डिमरीचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.
'स्पिरिट' हा चित्रपट प्रभासचा २५ वा चित्रपट आहे. तसेच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा तो भव्य बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण एका वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये वांगा आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक चांगल्या कलाकारांची जोडी एकत्र आणणार आहेत. या चित्रपटाचे हैदराबादमध्ये चित्रीकरण होईल. तसेच काही आंतरराष्ट्रीय ठिकाणीही त्याचे चित्रीकरण केले जाणार आहे.
टी-सिरीज आणि भद्रकाली पिक्चर्सचा हा अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभास एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर तृप्ती डिमरी देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सध्या चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. लवकरच याचं शूटिंग सुरू होणार असून प्रेक्षकांमध्ये या नव्या जोडीसाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.