'फसक्लास दाभाडे'मधील ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं प्रदर्शित

Fussclass Dabhade Movie |आधी हळद, मग लग्न आणि आता लग्नानंतरचा गोंधळ
 Fussclass Dabhade Movie
'फसक्लास दाभाडे'मधील ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं प्रदर्शितInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - दाभाडे कुटूंब सोनू आणि कोमलच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत असतानाच या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘यल्लो यल्लो’ या हळदीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवल्यानंतर आता, ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘तोड साखळी’ हे गाणं लग्नानंतरच्या गोंधळाच्या विधीवर आधारित असून सोनू आणि कोमलच्या लग्नानंतर दाभाडे कुटुंबाचे देवदर्शन आणि गोंधळाचा कार्यक्रम या गाण्यात पाहायला मिळत आहे.

या गाण्याचे शब्द सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत कारण ते जुन्या रूढी परंपरांची साखळी तोडूया असं दर्शवत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला एक छोटा प्रसंग आहे त्यातून आपण विचारांनी पुढारण्याची गरज असल्याचा स्पष्ट संदेश मिळत आहे. ‘तोड साखळी’ या गाण्याला युवाशाहीर रामानंद उगले यांचा दमदार आवाज लाभला असून अमितराज यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. तसेच सगळ्यांची मनं जिंकणारे बोल हे क्षितिज पटवर्धन यांचे आहेत!

भूषण कुमार म्हणतात, “‘तोड साखळी’ हे गाणं महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आणि नवदाम्पत्यांसाठी साजरा होणाऱ्या गोंधळ विधीच्या भावनिक सौंदर्याला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला एका नवीन रूपात सादर करणाऱ्या या गाण्याविषयी मला पूर्ण विश्वास आहे की, प्रेक्षकांना याची अनुभूती नक्कीच भावेल.”

आनंद एल राय म्हणतात, “ ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातील सगळीच गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. 'यल्लो यल्लो' हे सगळ्यांना थिरकायला लावणारं, नव्या आयुष्याची सुरुवात दाखवणारं ‘दिस सरले’ गाणं आणि ‘मनाला लायटिंग’ प्रेमगीत या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली असतानाच ‘तोड साखळी’ हे गोंधळ गीत आता प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे.”

हेमंत ढोमे म्हणतात, “ ‘तोड साखळी’ हे गाणं आमच्यासाठी खूप खास आहे कारण, गोंधळासारखा पारंपरिक विधी यानिमित्ताने आम्ही दाखवला आहे. पण त्यातून जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना मागे टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आम्हाला देता आला. याचं संपूर्ण श्रेय हे गीतकार क्षितिज पटवर्धन यांचं आहे. शिवाय या गाण्याची कोरीओग्राफी करण्याची संधी देखील मला या निमित्ताने मिळाली आहे, ज्याचा विशेष आनंद मला आहे. देवाला गाऱ्हाणे घालणारे हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”

यादिवशी रिलीज होणार ‘फसक्लास दाभाडे’

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र निर्मित ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग असून यात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news