

Smita Patil
पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोरंजन विश्वातील एक सोनेरी पर्व, आपल्या निखळ सौंदर्याने व दर्जेदार अभिनयाने हिंदी व मराठी चित्रपटात एक काळ गाजवलेल्या स्मिता पाटील यांचा १७ ऑक्टोबर हा जन्मदिवस. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी जगाला निरोप दिला. त्यांना जाऊन ३९ वर्षे झाले तरीही आपल्या दर्जेदार अभिनयाने अजूनही लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
स्मिता पाटील यांनी पदवीच्या शिक्षणानंतर पुण्यातील एका नाट्य संस्थेत थिएटर कलाकार म्हणून काम केले. १९७० च्या दरम्यान त्यांनी मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करायला सुरूवात केली. वृत्तनिवेदिका म्हणून काम करण्यापूर्वीच त्यांची रंगभूमीशी नाळ जुळली होती. यादरम्यान त्यांना दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी चित्रपटाची ऑफर दिली. श्याम बेनेगल यांनी १९७५ साली दिग्दर्शित केलेल्या 'चरणदास चोर' या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अवघ्या १० वर्षाच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी ८० हून अधिक हिंदी व मराठी चित्रपट केले. नमक हलाल, भूमिका, चक्र, मंथन, आक्रोश, बाजार, जैत रे जैत, उंबरठा, सामना असे अनेक त्यांचे दर्जेदार चित्रपट त्यातील भूमिका आजही लोकांच्या मनाला भूरळ घालते. (Smita Patil)
मराठी व हिंदी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयामुळे ओळखले जाणारे नाना पाटेकर यांना स्मिता पाटील यांनी चित्रपट क्षेत्रात नेले. याबाबत त्यांनी अनेकवेळा मुलाखतीतून खुलासा केला आहे. चित्रपटात काम करत असताना मराठी रंगभूमीशी स्मिता यांनी नातं टिकवून ठेवलं होतं. मराठी रंगभूमीवर काम करत असताना नाना पाटेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. (Smita Patil)
नाना पाटेकर यांनी चित्रपटात काम करावं, अशी स्मिता यांची इच्छा होती. मात्र, नाना मराठी रंगभूमीवरच समाधानी होते. अखेर नाना यांना स्मिता यांनी चित्रपटात काम करण्यास राजी केले व दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्याकडे त्यांची शिफारस केली. त्याच्या शिफारसीमुळे नाना यांना १९८४ साली आलेल्या 'आज की आवाज' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. स्मिता यांच्या मैत्रीखातरच आपण रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असल्याचे नाना पाटेकर यांनी मुलाखतीतून खुलासा केला आहे. त्यानंतर नाना पाटेकर यांनी अंकुश, परिंदा, प्रहार, क्रांतिवीर, तिरंगा, सिंहासन, भालू, पक पक पकाक, देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, नटसम्राट अशा दर्जेदार चित्रपटांसह अनेक चित्रपटात काम केले. स्मिता पाटील यांच्यामुळे चित्रपटसृष्टीला एक दमदार अभिनेता मिळाला आणि नाना पाटेकर यांचे आयुष्यच बदलून गेले.