

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी लिव्ह द वेकिंग ऑफ अ नेशन या आपल्या आगामी फिक्शनल शोच्या माध्यमातून इतिहासातील फारशा माहीत नसलेल्या एका प्रकरणावर प्रकाश टाकण्यास सज्ज आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तसेच इंटनॅशनल एमी पुरस्कारांसाठी नामांकन प्राप्त करणारे राम माधवानी यांनी मालिकेची निर्मिती-दिग्दर्शन केले आहे. हा शो ७ मार्चपासून केवळ सोनी लिव्हवरून स्ट्रीम होणार आहे.
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, वसाहतवादी फसवणुकीच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या कांतिलाल साहनी या वकिलाची ही कथा आहे. तारुक रैना कांतिलाल साहनीच्या भूमिकेत आहे. सत्ताधारी साम्राज्याची तळी उचलण्यासाठी हंटर आयोग इतिहासाचा विपर्यास करत असतानाच, कांतिलाल वर्णभेद, इतिहास खोडून टाकणे यांच्याविरोधात झुंज देतो आणि सत्याची बाजू लावून धरतो. लहानपणापासूनच्या अतूट मैत्रीत बांधले गेलेले कांतिलाल आणि त्याचे मित्र (अली अलाहबक्षच्या भूमिकेत साहिल मेहता, हरिसिंग औलाखच्या भूमिकेत भावशील सिंग आणि निकिता दत्ता हरीची पत्नी पूनमच्या भूमिकेत) परस्परविरोधी विचारधारा असूनही त्यांचे भवितव्य बदलू शकणारे एक कारस्थान उघड करतात. न्याय मृगजळासमान असलेल्या जगात दडवली गेलेली सत्ये हे उघड करू शकतील की त्या प्रयत्नांत त्यांचाच अंत होईल?
राम माधवानी या शोबद्दल म्हणाले, “वसाहतवाद आणि त्याचाच विस्तारित भाग म्हणून येणाऱ्या वर्णद्वेष व पूर्वग्रह यांसारख्या गोष्टींमध्ये मला नेहमीच सखोल रस वाटत आला आहे. सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व कलात्मक वसाहतवादाशी निगडित प्रश्न मला दीर्घकाळापासून त्रास देत आले आहेत. मी जेव्हा पुढील प्रोजेक्टचा विचार करत होतो, तेव्हा हा विषय भूतकाळातील, ब्रिटिश राजवटीतील आणि स्वातंत्र्यलढ्यातील असेल हे मला माहीत होते. त्यातूनच ‘द वेकिंग ऑफ अ नेशन'ची कल्पना साकार झाली.”
अमिता माधवानी यांनी राम माधवानी फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण केलेल्या या मालिकेत दमदार कलावंत आहेत. यात तारूक रैना, निकिता दत्ता, साहिल मेहता, भावशील सिंग, अॅलेक्स रिकी आणि पॉल मॅकएवान यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. शंतनू श्रीवास्तव, शत्रुजीत नाथ आणि राम माधवानी यांनी या शोचे लेखन केले आहे.