

Tamannaah Bhatia
गोवा : दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत 'आयटम साँग क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा डान्स परफॉर्मन्सचीच जास्त चर्चा होते. 'जेलर'मधील कावाला, 'स्त्री २' मधील आज की रात आणि 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधील 'गफूर' सारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता तिच्या गोव्यातील एका परफॉर्मन्सची चर्चा सुरू आहे.
नुकतेच तमन्नाने गोव्यातील एका भव्य न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये परफॉर्मन्स केला. तिच्या या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या परफॉर्मन्सपेक्षाही जास्त चर्चा झाली ती तिच्या मानधनाची. एका रिपोर्टनुसार, तमन्नाने ६ मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी ६ कोटी रुपये घेतल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे इंटरनेटवर चर्चांना उधाण आले आहे.
३१ डिसेंबर २०२५ रोजी गोव्यातील बागा बीचवरील लोकप्रिय 'लास ओलास बीच क्लब'मध्ये या नवीन वर्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तमन्नाने पंजाबी स्टार सोनम बाजवासोबत स्टेज शेअर केला. तमन्नाचे 'आज की रात' गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून तिच्या ऊर्जेचे आणि स्क्रीन प्रेझेन्सचे खूप कौतुक होत आहे.
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्नाला ६ मिनिटांसाठी ६ कोटी रुपये देण्यात आले, म्हणजेच प्रत्येक मिनिटाला १ कोटी रुपये इतके हे मानधन होते. जरी या आकड्यांना तमन्ना किंवा तिच्या टीमकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, या आकड्यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
या कार्यक्रमात तमन्नाशिवाय गायक मिलिंद गाबा तसेच डीजे चेतस, स्वप्नील आणि मॅक व्हिएरा यांनीही सादरीकरण केले, ज्यामुळे हा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठा न्यू इयर इव्हेंट ठरला.
तमन्ना शेवटची तमिळ चित्रपट 'अरनमनई ४' मध्ये दिसली होती. सध्या ती बॉलिवूडमधील तिच्या कामात व्यस्त असून, रिपोर्ट्सनुसार तिच्याकडे तीन हिंदी चित्रपट आहेत. याशिवाय ती आगामी काळात काही विशेष गाण्यांमध्येही दिसण्याची शक्यता आहे.