

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या शिखरावर असून, तिच्या आगामी चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘विठा’ आणि ‘नागीन’ या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ताज्या रिपोर्टनुसार श्रद्धा लवकरच ‘विठा’चे शूटिंग पूर्ण करून एप्रिलपासून ‘नागीन’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
श्रद्धा कपूर सध्या ‘विठा’ या चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यातील शूटिंग करत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. श्रद्धा ‘विठा’मध्ये पूर्णपणे गुंतलेली आहे. ही भूमिका शारीरिकद़ृष्ट्या खूप कष्टाची आणि भावनिकद़ृष्ट्या अत्यंत तीव्र आहे. तरीही ती ठरलेल्या वेळापत्रकात शूट पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. मार्चपर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल, असा निर्मात्यांना विश्वास आहे.
याआधी ‘विठा’च्या सेटवर लावणी नृत्य सादर करताना श्रद्धाच्या पायाला दुखापतही झाली होती, मात्र तरीही तिने शूटिंग सुरू ठेवले. ‘विठा’नंतर श्रद्धा कपूर थेट तिच्या बहुचर्चित चित्रपट ‘नागीन’च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘नागीन’साठी व्हीएफएक्स डिझाईनपासून कास्टिंगपर्यंत सर्व गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक ठरवल्या आहेत. श्रद्धा मुख्य भूमिकेसाठी निश्चित झाल्यानंतर उर्वरित कलाकारांची निवड पूर्ण झाली आहे. यात श्रद्धा इच्छाधारी ‘नागीन’ साकारत आहे. एप्रिलपासून शूटिंग सुरू करण्याचा प्लॅन आहे.’