पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान 'स्वरांची गंगा' समजल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
बाबुजी आणि आशाबाईंनी कायमच आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. त्यांच्या स्वर्गीय सुरांनी नटलेल्या प्रत्येक गाण्याला लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. या दोघांनी गायलेली सगळीच गाणी ऐकताना त्या कलाकृतीच्या अलौकिकतेचा प्रत्यय येतो. ही गाणी सदाबहार असून 'जगाच्या पाठीवर', 'या सुखांनो या', 'धाकटी बहीण', 'लाखाची गोष्ट', 'सुवासिनी', 'लक्ष्मीची पाऊले' अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीचा आवाज लाभला आहे.
आशा भोसले बाबुजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, " बाबुजी म्हणजे एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार. 'का रे दुरावा…' चा एक गंमतीदार किस्सा म्हणजे. हे गाणे गाताना 'का रे दुरावा… ही ओळ गाताना बाबुजींनी मला खूपच हावभाव व्यक्त करण्यास सांगितले. परंतु हे करताना मला खूप हसायला येत होते. मी असे हावभाव दिले तर लोकं वेडं म्हणतील मला. त्यावर त्यांचे उत्तर होते, नाही.. नाही… चांगलं म्हणतील. अशा पद्धतीने ते गाणं शिकवायचे. त्यामुळे आम्ही समृद्ध होत गेलो. मी बाबुजींना खूप मानते, ते माझे गुरूच आहेत. त्यांची आयुष्यगाथा सांगणारा चित्रपट येतोय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद."
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.