

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी आणि हिंदी प्रेक्षकांसाठी गुन्हेगारी थरारपट 'जिलबी' २१ फेब्रुवारी, २०२५ रोजी अल्ट्रा झकास (मराठी) आणि अल्ट्रा प्ले (हिंदी) या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च केला गेला! मुंबईत घडलेल्या एका रहस्यमय हत्याकांडाची, ज्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरवून सोडल्याची कथा यामध्ये आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स सादर 'जिलबी' हिंदीत पाहता येणार आहे. निर्माते आनंद पंडित आणि रूपा पंडित प्रस्तुत, नितीन कांबळे यांच्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाखाली साकारलेला हा एक अनोखा रहस्यमय चित्रपट आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, गणेश यादव, प्रणव रावराणे, पर्णा पेठे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य, ऋषी देशपांडे, राजेश कांबळे, पंकज खामकर आणि दिलीप कराड यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती सुभेदार यांचा जावई आशुतोष पाचा यांचा निर्घृण खून होतो आणि त्याचा तपास करण्याची जबाबदारी एका हुशार पण भ्रष्ट पोलीस अधिकारी विजय करमरकर यांच्याकडे दिली जाते. तपासाच्या दरम्यान, करमरकर पोलिसाला सुभेदार कुटुंबातील काळ्या दुनियेची सत्य समोर येतात. घरातील सदस्यांमध्ये असलेली ही कटकारस्थानं, अनैतिक संबंध आणि वैयक्तिक हत्येच्या मागे या गूढ रहस्याचा संकेत देतात? करमरकरला या प्रकरणाचा फायदा करून घ्यायचा असतो, पण लवकरच त्याला समजते की, तो स्वतःच एका मोठ्या जाळ्यात अडकत चालला आहे. आता या गुंतागुंतीतून सुटका करून सत्य बाहेर आणणे त्याच्या आयुष्याचा प्रश्न ठरतो.