

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अभाविपने डाव्या विद्यार्थी संघटनांकडून ही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) अभिनेता विक्रांत मेसीच्या या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. चित्रपटाचे स्क्रिनिंग जेएनयू परिसरातील ढाक्याच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडले. गुजरातमधील गोध्रा घटनेवर हा चित्रपट बनवला आहे. स्क्रिनिंग सुरू असतानाच अचानक यावेळी दगडफेक झाली. या दगडफेकीत घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. हा चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 डिसेंबर रोजी संसदेच्या बालयोगी सभागृहात 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट पाहिला. निर्मात्यांकडून या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री आणि खासदारही या स्क्रीनिंगला उपस्थित होते. यावेळी विक्रांत मेसी, राशी खन्ना, रिद्दी डोगरा आणि निर्माते यांच्यासह चित्रपटाची स्टारकास्टही उपस्थित होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही छायाचित्रे शेअर केली. मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आणि लिहिले की, एनडीएच्या सहकारी खासदारांसोबत 'द साबरमती रिपोर्ट'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. ‘चित्रपटाच्या निर्मात्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेही उत्कृष्ट काम केल्याच त्यांनी लिहीलं आहे. त्याचवेळी अभिनेता विक्रांत मॅसीनेही पीएम मोदींसोबत बसून चित्रपट पाहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
'मी पंतप्रधान आणि सर्व कॅबिनेट मंत्री आणि अनेक खासदारांसोबत हा चित्रपट पाहिला. तो एक खास अनुभव होता. मी त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही, कारण मी खूप आनंदी आहे. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे, असे अभिनेता विक्रांत मेसी याने चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर पत्रकारांना सांगितले.
धीरज सरना दिग्दर्शित आणि राशी खन्ना, रिद्धी डोगरा अभिनीत साबरमती रिपोर्ट चित्रपट २७ फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये अयोध्येहून धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतणाऱ्या 59 भाविकांचा मृत्यू झाला होता. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.