

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडमधील प्रसिद्ध नवाब आणि अभिनेता सैफ अली खान यांचा पतौडी पॅलेस हा भव्य महाल नेहमीच चर्चेचा विषय असतो. गुरुग्राम येथे असलेली ही आलिशान वास्तू सुमारे ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची असून, सैफच्या राजघराण्याच्या वारशाचा तो भाग आहे. परंतु या पॅलेसच्या अगदी शेजारी असलेली ‘पीली कोठी’ नावाची एक इमारत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, या कोठीबद्दलचा एक रहस्यमय आणि भयानक अनुभव सोहा अली खान हिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शेअर केला आहे.
सोहा सध्या तिच्या प्राईम व्हिडिओ वरील हॉरर वेबसीरिज ‘छोरी २’ च्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. याच दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना तिने आपल्या कुटुंबाच्या भूतकाळातील एक गूढ आणि थोडंसं भयावह प्रकरण उलगडलं. ती म्हणाली, "पतौडी पॅलेसच्या बाजूलाच असलेली 'पीली कोठी' ही आमच्या कुटुंबाच्या ताब्यात होती. आम्ही सर्वजण तिथे राहत होतो. मात्र, एका रात्री अचानक सगळ्यांनी आपलं सामान बांधलं आणि कोठी सोडून पटौदी पॅलेसमध्ये राहायला गेलो."
सोहाने यामागचं कारणही सांगितलं. ती म्हणाली- "त्या कोठीमध्ये काही अलौकिक शक्तींचं अस्तित्व जाणवत होतं. माझ्या मोठ्या काकींना (पणजीा) एका भूताने थप्पड मारली होती. त्यांच्या चेहऱ्यावर हाताचे ठसे दिसले होते. ही घटना इतकी भयानक होती की, कुटुंब भयभीत झालं आणि तेथून तात्काळ स्थलांतर केलं."
ती पुढे म्हणते, "आजही ती कोठी रिकामी आहे. इतक्या मोठ्या जागेवर असूनही तिथं कोणी राहत नाही, ना तिथं काही विकास होतो. ती जागा खंडहरासारखी दिसते. त्या ठिकाणी कोणीच जाऊ इच्छित नाही, यामागे नक्कीच काहीतरी गूढ कारण आहे."
सैफ अली खानने यावर अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र सोहा अली खानच्या या खुलाशामुळे 'पीली कोठी' चर्चेचा विषय बनली आहे. काही लोकांना वाटतं की ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असू शकते. अनेकांना वाटतं की हे सर्व अंधश्रद्धेवर आधारित आहे. तर काहीजण हे सत्य मानून ती जागा अजूनही तिथे जाणं टाळतात.