

Sitaare Zameen Par Screening Raj Thackeray Sachin Tendulkar Video:
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटाची चाहत्यांसह सर्वांनाच उत्सुकता आहे. मुंबईत या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दोघंही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला एकत्रच पोहोचले. सचिन आणि राज यांच्या एंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सचिन यांना पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ‘सचिन, सचिन’ असा जयघोष करत लाडक्या क्रिकेटपटूचं स्वागत केलं.
शुक्रवारी 6 जून रोजी मुंबईत आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. 2007 मधील सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाची जितकी उत्सुकता आहे तेवढीच चर्चा स्पेशल स्क्रिनिंगचीही आहे. चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळीही उपस्थित होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होते. स्क्रिनिंग जिथे पार पडलं तिथे या चौघांच्या आगमनाचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे.
स्क्रिनिंगच्या ठिकाणी राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरांनी एकत्र एंट्री करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओत काय दिसते?
व्हिडिओ असे दिसतंय की, आधी सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी एका हॉलमध्ये प्रवेश करतात. सचिन यांना बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तिथे असलेल्या एक मुलगा आनंदाच्या भरात अक्षरश: उड्या मारतो. काही क्षणातच सगळे सचिन सचिन असा जयघोष करतात. सचिनच्या मागोमाग राज ठाकरेही प्रवेश करतात. या दोघांचंही आमिर आणि किरण राव स्वागत करताना दिसत आहेत.
सितारे जमीन पर हा चित्रपट चॅम्पियन्स या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. एक बास्केटबॉल संघ ज्यातील खेळाडूंची बौद्धिक क्षमता सर्वसामान्यांपेक्षा वेगळी आहे, अशा संघाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाला भारतीय रंग देण्यात आला असून बास्केट बॉल प्रशिक्षकाची भूमिका आमिर खानने साकारली आहे. 20 जून 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणारेय.