पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला. काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. दरम्यान, त्याच्या निधनाच्या अफवा पसरल्यानंतर त्याला स्वत:ला सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती द्यावी लागली की, तो ठणठणीत आहे. नेमकं काय घडलं पाहुया.
“माझी लहान मुलगी रोज शाळेत जाते, ती आधीच माझ्या आरोग्याबद्दल काळजीत आहे, ती सतत मला प्रश्न विचारत असते. या खोट्या बातमीमुळे तिची भीती आणखी वाढतेय. तिला तिच्या शाळेत याबद्दल शिक्षकांकडून, वर्गमित्रांकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. तिला आम्ही कुटुंब म्हणून सांभाळण्याचा प्रयत्न करतोय.”
आपण जिवंत असल्याचे त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. श्रेयसने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. श्रेयसने लिहिलं की, “मी जिवंत आहे, आनंदी आहे आणि निरोगी आहे. हेच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझ्या निधनाची माहिती देणाऱ्या एका व्हायरल पोस्टबद्दल मला कळालं. विनोद मी समजू शकतो, पण जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो तेव्हा खरा त्रास होतो. एखाद्याच्या विनोदातून सुरू झालेली गोष्ट आता अनावश्यक काळजीचं निर्माण करत आहे, तसेच माझ्यासाठी काळजी करणाऱ्या लोकांच्या, खासकरून माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ होत आहे.”
“अशा पोस्ट करणाऱ्या व फॉरवर्ड करणाऱ्यांनी हे थांबवावं आणि या पोस्टच्या होणाऱ्या परिणामांचा विचार करावा. बऱ्याच लोकांनी माझ्या आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी विनोदाचा वापर केला जातोय, हे खूपच वाईट आहे. कारण या गोष्टी माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ शकतात आणि आमच्या आयुष्यात व्यत्यय आणतात. अशा अफवा पसरल्या की, तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही. तिच्या कुटुंबावरही परिणाम होतो. खासकरून लहान मुलं जे या गोष्टी समजू शकत नाही. ज्यांनी माझी विचारपूस केली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तुमची काळजी आणि प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आही.''
ट्रोलर्सना, माझी एकच विनंती आहे की, कृपया हे सगळं थांबवा. दुसऱ्यांवर असे विनोद करू नका. तुमच्याबरोबरही असं काही घडावं, असं मला कधीच वाटणार नाही, त्यामुळे थोडे संवेदनशील व्हा.
श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेला इमर्जन्सी हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.