पुढारी ऑनलाईन डेस्क - राजस्थान हायकोर्टाने प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दिलासा दिला आहे. तथाकथित मुलाखतीत एका समुदायाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने तिच्याविरोधात केस दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणी शिल्पा शेट्टीला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हे प्रकरण २०१३ चे आहे. मुलाखतीवेळी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने तिला पोलिस कारवाई आणि कोर्ट केस सोबतच लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यासाठी शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर माफी देखील मागितली होती.
सूत्रांनुसार, राजस्थान हायकोर्टाने गुरुवारी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी विरोधात सुरु असलेल्या प्रकरणाची सुनावणी केली. शिल्पा शेट्टी विरोधात दाखल झालेली केस कोर्टाने एसटी एससी ॲक्ट अंतर्गत फेटाळली आहे तर सलमान खानची केस प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये राजस्थानच्या चुरू ठाण्यात अशोक पंवार नावाच्या व्यक्तीने सलमान खान आणि शिल्पा शेट्टी विरोधात एससी एसटीॲक्ट अंतर्गत केस दाखल केली होती. आरोप होते की, शिल्पाने एका जुन्या मुलाखतीमध्ये आक्षेपार्ह शब्द चुकीच्या पद्धतीने वापरले होते, ज्यामुळे वाल्मिकी समुदायाचा अपमान झाला आणि सोबतच समुदायाच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या मुलाखतीत सलमान खान देखील शिल्पासोबत उपस्थित होता.