

Shekhar Suman shared Instagram post about son Ayush
मुंबई - लोकप्रिय अभिनेते आणि टीव्ही होस्ट शेखर सुमन यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाबद्दल एक भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मोठा मुलगा आयुष याने जगाचा निरोप घेतल्यानंतर आयुष्य कसं कोसळले, हे सांगितलं. आयुषला एका दुर्मिळ हृदयविकारामुळे गमावल्याची वेदना त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
शेखर सुमन यांनी आपल्या दिवंगत मुलाचा फोटो पस्ट केला आहे. त्यामध्ये ते स्वत: आपल्या पत्नी आणि मुलासमवेत दिसत आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, ''आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखातून आम्ही बाहेर आलो आहोत. आमचा मोठा मुलगा आयुष एका दुर्मिळ हृदयविकाराने गमावला. त्यानंतर अलका आणि मी वर्षानुवर्षे तीव्र नैराश्यातून गेलो.''
शेखर सुमन यांनी आपल्या जीवनातील वाईट प्रसंगाबद्दल सांगितले. त्यांचा मोठा मुलगा आयुषचा वयाच्या ११ वर्षी गंभीर आजाराने मृत्यू झाला होता. ते म्हणाले की, ''या सर्व कठीण काळात आमचा दुसरा मुलगा अध्ययन आमच्यासाठी जगण्याचं कारण ठरला. त्याच्यात आम्हाला आयुषची झलक दिसते. तोच आमच्या शक्तीचा मोठा स्रोत आहे.''
या दुःखद घटनेच्या काळात पत्नी अलका हिने प्रचंड मानसिक बळ दाखवल्याचेही शेखर सुमन यांनी नमूद केले. ''मी कोसळलो होतो, जगू इच्छित नव्हतो. पण अलका माझ्यापेक्षा अधिक बलवान ठरली. तिने मला आधार दिला आणि कुटुंबाला जिब्राल्टरच्या खडकासारखे एकत्र उभं ठेवलं.'' असं ते म्हणाले.
शेखर सुमन यांच्या या पोस्टमुळे फॅन्सनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना धीर देणारे संदेश दिले लिहिले आहेत. शेखर यांनी आपल्या आयुष्यातील वेदना खुलेपणाने व्यक्त केल्यानंतर या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
शेखर यांना १९८९ मध्ये पहिल्यांदा समजलं होतं की, आपल्या मुलाला गंभीर आजार झाला आहे. त्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांनी मुलगा आयुषला आपल्या कुशीत घेऊन अनेक दिवस घालवले. कारण आयुषकडे खूप कमी वेळ होता. डॉक्टरांनी सांगितले होते की तो, ८ महिने जगू शकेल.