

नवी दिल्ली : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने आपल्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या ओळखीचा अनधिकृत व्यावसायिक वापर करणार्यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलणार्या सेलिब्रिटींच्या वाढत्या यादीत आता सलमानच्या नावाचाही समावेश झाला आहे.
आपल्या याचिकेत सलमान खानने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वेबसाइटस् आणि ई-कॉमर्स कंपन्यांना त्याचे नाव, फोटो, आवाज, किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख पटेल अशा कोणत्याही गोष्टीचा पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यापासून रोखण्याची न्यायालयाला विनंती केली आहे.
याचिकेनुसार, अशा प्रकारच्या अनधिकृत वापरामुळे केवळ अभिनेत्याच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन होत नाही, तर खोट्या जाहिराती किंवा संबंध दर्शवून लोकांची दिशाभूलही केली जाते. यामुळे तिसर्या पक्षांना त्याच्या प्रतिष्ठेचा वापर करून फायदा उचलण्याची संधी मिळते.
व्यक्तिमत्व किंवा प्रसिद्धी हक्क एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव, प्रतिमा, दिसणे, आवाज किंवा इतर वैयक्तिक ओळखण्यायोग्य वैशिष्ट्यांच्या वापराचे नियंत्रण करण्याचा आणि त्यातून व्यावसायिक लाभ मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देतात.