Savlyachi Janu Savali | 'सावळ्याची जणू सावली' - मेघा धाडेने अनुभव केले शेअर

'भक्तिमय वातावरणात आम्ही 'सावळ्याची जणू सावली' ची सुरुवात केली'
Savlyachi Janu Savali megha dhade
Instagram
Published on
Updated on

सावळ्याची जणू सावली मालिकेत अभिनेत्री मेघा धाडे, भैरवी वझेची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल संवाद साधताना मेघाने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. "माझ्या भूमिकेचं नाव आहे भैरवी वझे, ती एक अतयंत महत्वाकांक्षी बाई, सुप्रसिद्ध गायिका आहे. तिने शास्त्रीय संगीतात मोठं नाव कमावलं आहे. स्वतःच गुरुकुल असेल अशी ही भैरवी. ती आपल्या संगीताच्या परंपरेला जपण्यासाठी कुठल्याही थरावर जाऊ शकते, किंवा संगीताचा वारसा नेण्यासाठी साधण्यासाठी परिसीमा कशी गाठते तो भैरवीचा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहता येणार आहे.

मेघा धाडेची निवड कशी झाली?

मेघा म्हणाली, माझी निवड कशी झाली हा एक गंमतशीर किस्सा आहे. इतकी लवकर कास्टिंग प्रक्रिया आजवर कोणाचीच झाली नसावी जितक्या लवकर माझी निवड या भूमिकेसाठी आणि मालिकेसाठी झाली. माझी इथे आज लुक टेस्ट आणि लगेच दुसऱ्या दिवशी शूट सुरु इतक्या लगेच ते सगळं जुळून आलं. सर्वात आधी कलाकाराला भूमिका आवडली पाहिजे, मग प्रोडक्शन आवडलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनेलने त्यांचा होकार दिला पाहिजे. मी खूप खुश आहे की इतकं सुंदर पात्र माझ्या पदरात पडलं. जेव्हा ‘सावळ्याची जणू सावली’ चा प्रोमो आऊट झाला तो दिवस माझ्यासाठी कुठच्या उत्सवा पेक्षा कमी नव्हता, कारण ज्यादिवशी प्रोमो आला त्यादिवशी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आला आणि त्यासोबत मित्रपरिवाराचा आणि मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांचे फोन आले इतका छान प्रतिसाद मिळाला.

भोरमधील सुंदर मंदिरात शूटींग

भैरवीला मालिकेत पाहून प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असणार हे ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आम्ही अनेक ठिकाणी शूट केले. माझा एन्ट्री सीन आहे तो आम्ही भोर मधल्या सुंदर मंदिरात शूट केला. हे मंदिर पावन झाले आहे संत सोपान महाराजांच्या समाधींनी. आऊटडोअर शूटच्या आठवणी बद्दल बोलायचे झाले तर कानावर सतत भजन आणि टाळाचा आवाज येणं अशा भक्तिमय वातावरणात आम्ही शूटिंग करत होतो. जेव्हा सीनमधून वेळ मिळत होता तेव्हा आम्ही भजनी मंडळात सहभाग घेऊन स्वतः फुगड्या घातल्या. आम्ही भक्तीरंगात इतके तल्लीन झालो होतो की क्षणभर विसरलो आम्ही तिथे शूटसाठी आलो आहोत. मला वाटतं अशा पद्धतींनी जर शूटिंगची सुरुवात होत असेल तर त्याचा परिणाम छानच होणार. कारण पांडुरंगाचे आशीर्वाद आमच्यावर सोबत आहेत. आमची त्याच्यावर श्रद्धा आहे. या मालिकेला भरभरून यश मिळेल याची मी नक्कीच अपेक्षा ठेवते.

''प्राप्ती रेडकर आमच्या मालिकेची नायिका आणि भाग्यश्री दळवी जी माझ्या मुलीची भूमिका साकारत आहे या दोन मैत्रिणी मिळाल्या आहेत मला. मालिकेत भैरवीची मैत्रीण तिलोत्तमा म्हणजेच सुलेखा तळवलकर हिच्याशी अनेक वर्षांनी भेट झाली आणि आता आम्ही एकत्र काम करणार आहोत तर खूप मस्त वाटतंय. एकंदरीत 'सावळ्याची जणू सावली' चा आमचा जो परिवार आहे तो एकदम प्रेमळ आहे, खूप खुश आहे मी या परिवाराचा भाग होऊन.''

‘सावळ्याची जणू सावली’ २३ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news