पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेते किरण माने यांना आपल्या मित्रासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. सतीश्राव, न भेटताच सोडून गेलात राव..दोस्तीत दगाबाजी केलीत असे म्हणते माने यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून मन मोकळं केलं आहे. कविता आणि गझलेच्या दुनियेत किलर दराडे नावाने प्रसिद्ध असलेले शब्दप्रभू सतीश दराडे यांचे रविवारी (दि.८) निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. टोकवाडी (ता. वडवणी जि. बीड) येथील सतीश दराडे यांचे चार गझल संग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये विठोबा संपली वारी, माझ्या आषाढाचे अंश, कैदखान्याच्या छतावर, श्वासांच्या समिधा असे गझल संग्रहाचा समावेश आहे. स. बा. दराडे या नावाने ते गझल लिहित.
..."सतीश्राव, काय चाल्लंय? रैवार आज. मटनबिटन हान्लं का नाय?" मी दुपारी पलंगावर पडून मेसेज पाठवायचो... लगीच दराडे मास्तरांचं त्यांच्या श्टाईलनं उत्तर यायचं,
"जन्म दळतो एक सुट्टीचा दिवस
फार छळतो एक सुट्टीचा दिवस..."
आहाहाहा... म्हनायचो, "आंगाश्शी. ह्यासाठीच तुमाला मेसेज करतो मी. फुडं ऐकवा."
"ऐका,
चंद्र पृथ्वीला 'बसू' म्हणतो तरी
खूप पळतो एक सुट्टीचा दिवस..."
मी आग्ग्गाय्याया...क्या बात म्हन्नार, तेवढ्यात तुमचा नेहमीचा मेसेज यायचा, "वडील, कधी भेटायचं आपण?"
सतीश्राव, न भेटताच सोडून गेलात राव. ध्यानीमनी नसताना थेट शेवटचा रामराम केलात? आपण दोघंबी प्रत्येक श्वास स्वत:च्या मर्जीनं घेणारी मान्सं. त्यामुळं खरंतर 'तार' जुळलीवती. पण सोडताना मात्र तुमी ठरवून सोडल्यागत श्वास सोडलात... हे बरं नाय केलंत. ही ती वेळ नव्हती. 'जख्खड म्हातारं हून पाक मरूस्तोवर मन भरुन जगायचं' असं ठरवलेली आपण माणसं आहोत, हे विसरलात तुम्ही. दोस्तीत दगाबाजी केलीत.
तुमचं माझं व्हाॅटस् ॲप चॅट नुस्तं छापलं तरी ते 'बेस्टसेलर' ठरंल अशी बॅटिंग करायचा राव तुमी. कधी म्हणायचात, "वडील, आत्ताच ड्युटी पार्लरवरनं आलो." कधी सांगायचात "नाईन्टीचा पेग शिल्लक असलेल्या बाटलीला मराठीत 'अर्धशिशी' म्हण्तात." मी हसूनहसून बेजार व्हायचो. अभिनयानंतर गझल म्हणजे माझं 'काळीज'. मराठीतल्या माझ्या आवडीच्या जवळजवळ सगळ्या गझलकारांबरोबर मनमुराद रमायचा आनंद घेतला मी. अजुनबी घेतो. तुमच्याशी प्रत्यक्षात गझलरंगात रंगायचं र्हाऊनच गेलं याची टोचणी आता आयुष्यभर लागून राहील...
चौदा एप्रिलला फेसबुकवर आंबेडकर जयंतीच्या पोस्टवर पोस्ट पडत होत्या. तुमी एकच ओळ लिहीली होती :
'सतिश #बाबासाहेब दराडे !'
बास. नादच नाय करायचा. म्हन्लं एकच 'दिल' हाय हो सतिश्राव आमचं. किती वेळा ववाळून टाकावं तुमच्यावरनं?
...आता तुमचे शेर घुसमटून फिरतायत आमच्या डोळ्याफुडं... भिरभिरत्या नजरेनं बघतायत आमच्याकडं... अनाथ लेकरांसारखे... त्यांना काय सांगू?
"मंदिराच्या आत अत्याचार झाला,
देव नसतो आज साक्षात्कार झाला..."
हा शेर आज पोरका झाला.
"फुगतात का भिताडे याचा कयास घ्यावा...
नुसताच पोपड्यांवर फासू नये गिलावा !"
या शेराच्या डोक्यावरचं छत्र हरपलं.
असे असंख्य शेर आज आम्हाला अस्वस्थ करत सैरावैरा फिरायला लागलेत...
काय सांगू त्यांना?
सतिश दराडे हा मराठी गझलविश्वातला खुप महत्त्वाचा गझलकार आज गेला. मराठी गझलेचं डोंगराएवढं नुकसान झालंय... आणि आम्हा रसिकांचं आभाळाएवढं. लै लै लै रूखरूख लावलीत सतीश्राव... अलविदा.