

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'सन मराठी' वाहिनीवर संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित 'सखा माझा पांडुरंग' ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे, सखू ही भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे, पांडू ही भूमिका साकारणारा बालकलाकार रेवांत काकडे असणार आहेत.
मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी व रुची कुलकर्णी, लेखक प्रसाद ठोसर कराड येथे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. महाराष्ट्रात महिला संत सखूबाईंचं एकमेव मंदिर हे कराड येथे आहे. या पत्रकार परिषदेत 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला.
मालिकेचे निर्माते संगीत कुलकर्णी म्हणाले, "मालिका करताना अनेक कथानक डोळ्यासमोर असतात. पण आपल्या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभला आहे. कुठूनही विठ्ठलाचं नामस्मरण केलं की, विठुराया आपल्या मदतीला धावून येतोच. आजपर्यंत आपण कधी महिला संत सखुबाई यांच्याबद्दल फारस ऐकलं नव्हतं. आताच्या पिढीला संतांबद्दल माहिती मिळावी. हाच आमचा उद्देश आहे. ही मालिका फक्त वारकरी संप्रदाय नाही तर प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल ही खात्री आहे."
नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे म्हणाले की, संत सखुबाई यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण या मालिकेच्या माध्यमातून संत सखुबाई यांची महती जाणून घ्यायला मिळणार आहे. मालिकेचा पहिला भाग बघताना मला स्वतःच्या भूमिकेचा खूप राग आला. पण नाकारात्मक भूमिका म्हंटलं तर त्या भूमिकेचा प्रेक्षकांना राग आला तर नक्कीच कलाकारांची मेहनत फळास लागते.