पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाविषयी कलाकार आणि चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.
'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट आजही चाहत्यांना आवडतो. त्यामुळे आता "नवरा माझा नवसाचा २" मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे. या टीजरमधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.