पुढारी ऑनलाईन डेस्क - गेले वर्षभर 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रांवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे. कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेला निरोप देत आहे. याला कारण ठरलंय खुशबूकडे असलेली एक गुड न्यूज. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. खुशबूने ७ महिन्यांच्या प्रेग्नेंसीतही हा प्रवास काम करत पूर्ण केला आहे.
खुशबूकडून ऐकूया तिचा हा प्रवास कसा होता आणि मालिकेला निरोप देत असताना तिच्या मनात काय भावना आहेत. "उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. २०२३ जुलै मध्ये ह्या मालिकेचे चित्रीकरण सुरु केलं होतं आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. ह्याचसोबत मला एक वेगळा प्रेक्षक वर्ग लाभला. उमा आणि ही मालिका माझ्या हृदयाच्या जवळ राहील.
मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण, जितके सण आहेत तितके ह्या मालिकेत आणि सेट वर आम्ही साजरे केले. गंमत अशी की, काही मालिका कधी-कधी आधी शूट करतात पण आमचं नेमकं ज्यादिवशी तो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेट वरती वेगळीच ऊर्जा असायची. अतिशय खास कारण आहे की मी उमाला आणि मालिकेला निरोप देत आहे. हा खरंच गुडबाय आहे. कारण खूप छान कारणांनी बाय बोलतेय. मालिकेमुळे मला उमाई म्हणून ओळख मिळाली आणि आता ह्या उमाईची खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आली आहे. ह्या काळात 'सारं काही तिच्यासाठी' शूटिंग करण्याचा अनुभव अद्भूत होता.
सुरुवातीला मला माहिती नव्हतं की, हा प्रवास कसा असणार आहे. कारण सगळं नवीन होतं माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी नाहीतर प्रोडक्शनसाठीही. पण मी स्वतःला एक मंत्र समजावलं होतं की, आजचा दिवस आणि आजचा क्षण हा जास्त महत्वाचा आहे. प्रत्येक दिवस नव्याने सामोरे जायचं आणि काम करायचं. शूट करताना मला माझ्या क्षमतेची जाणीव झाली. ह्या ८ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबू सापडली. मी चित्रपटाच्या टीमशी बोलले. मी त्यांना विचारलं आता काय आणि आता कसं करूया. तेव्हा त्यांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं, काय करायचं, कसं करायचं ते तू आमच्यावर सोड, तू फक्त तुझी प्रेग्नंन्सी एन्जॉय कर, बाकी सगळं आपण सांभाळून घेऊ. उमाचा प्रवास पुढे पल्लवी वैद्य सांभाळणार आहे. नवीन उमाची भूमिका पल्लवी वैद्य साकारणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे."
'सारं काही तिच्यासाठी' रोज संध्या. ६.३० वा. झी मराठीवर पाहता येईल.